‘हॅरिज्‌ हाऊस’ ठरला सर्वोत्त्कृष्ट अल्बम

 लॉस एंजेलिस : संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचे ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाले असून ‘हॅरिज्‌ हाऊस’ने सर्वोत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार पटकाविला आहे. प्रसिद्ध गायिका बियॉन्स हिने विक्रमी ३२ वा ग्रॅमी पुरस्कार पटकाविला आहे. बंगळूरमधील संगीत संयोजक रिकी केज यांच्या ‘डिव्हाइन टाइड्‌स’ या अल्बमलाही बेस्ट इमर्सिव्ह अल्बम या प्रकारात ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.लॉस एंजेलिस येथे ६५ वा ग्रॅमी पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा झाला. बियॉन्स हिच्या ‘रेनेसाँ’ला सर्वोत्तम डान्स अल्बम या प्रकारात पुरस्कार मिळाला. तिने हंगेरीच्या जॉर्ज सोल्ती यांचा ३१ ग्रॅमी पुरस्काराचा विक्रम मोडला. ‘हॅरिज्‌ हाऊस’ला सर्वोत्तम अल्बमबरोबरच सर्वोत्तम पॉप व्होकल अल्बमचाही ग्रॅमी पुरस्कार मिळाला. ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’चा पुरस्कार ‘अबाऊट डॅम टाइम’साठी लिझो हिला जाहीर झाला.केज यांना स्टुअर्ट कोपलँड यांच्यासह ‘डिव्हाइन टाइड्‌स’साठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. केज यांचाहा तिसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. केज यांनी हा पुरस्कार भारताला समर्पित केला आहे. ‘डिव्हाइन टाइड्‌स’ हा नऊ गाण्यांचा अल्बम आहे. प्रत्येक जीवाला महत्त्व आहे, हा संदेश या गाण्यांमधून देण्यात आला आहे.



प्रमुख विजेते

  • सर्वोत्तम अल्बम : हॅरिज्‌ हाऊस

  • सर्वोत्तम रेकॉर्ड : अबाऊट डॅम टाइम

  • सर्वोत्तम गीत : जस्ट लाइक दॅट

  • सर्वोत्तम नवा कलाकार : सामरा जॉय

  • सर्वोत्तम पॉप सादरीकरण : इझी ऑन मी

  • सर्वोत्तम म्युझिक व्हिडिओ : ऑल टू वेल : द शॉर्ट फिल्म

  • सर्वोत्तम रॉक साँग : ब्रोकन हॉर्सेस

  • सर्वोत्तम रॉक अल्बम : पेशंट नं. ९

तुरुंगातील इराणी गायकाला पुरस्कार

इराणमधील सरकारविरोधी आंदोलनाचे गीत बनलेल्या ‘बाराये’ या गीतासाठी इराणी गायक शेरविन हाजीपोर याला सामाजिक बदल घडवून आणणारे गाणे या प्रकारात ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाल्यावर उपस्थितांनी जल्लोष केला. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी या पुरस्काराची घोषणा केल्यावर सध्या इराणच्या तुरुंगात असलेल्या शेरविन यालाही आश्‍चर्याचा धक्का बसला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू आले.शेरविन याच्या गीताने इराण सरकारला हादरवून सोडले आहे. ते गीत ओठांवर ठेवतच इराणी नागरिकांनी सामाजिक बंधनांविरोधात सरकारविरोधात आंदोलन पेटवत ठेवले आहे. ‘रस्त्यांवर नाचण्यासाठी, चुंबन घेताना मनात वाटणाऱ्या भीतीसाठी...’ असे या गीताचे सुरुवातीचे बोल आहेत. २५ वर्षाच्या शेरविनवर सरकारविरोधात कारस्थान केल्याचा आरोप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने