कांदा खरेदीच्या प्रश्नावरुन विरोधकांचा गोंधळ; उत्तर देताना मुख्यमंत्री संतापले!

मुंबई : विधानसभेत आजही अवकाळी पावसामुळं झालेलं नुकसान आणि कांद्याच्या भाव मोठ्या प्रमाणावर पडलेले असल्यानं सरकारनं कांदा खरेदीच्या प्रश्नावरुन विरोधकांनी बराच गोंधळ घातला. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले आणि त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.कांदा प्रश्नावर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कांदा खरेदी झालेली नाही, असं अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं. पवारांच्या या मुद्द्याला उत्तर देण्यसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उठले आणि बोलू लागले. पण अजित पवारांची बाजू लावून धरताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यानं मुख्यमंत्री चांगलेच भडकले.



उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, काल आणि परवाही मी सांगितलं की नाफेडची खरेदी सुरु झालेली आहे. सगळीकडे नाही तर काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरु झालेली आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यावर छगन भूजबळ यांनी दिलासा कधी देणार? असा सवाल विचारला त्यानंतर मुख्यमंत्री भडकले आणि म्हणाले, "आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपये दिले. तुमच्यासारखी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली नाहीत. नियमित कर्जफड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपये देतो बोलून दिले का? आम्ही दिले ते!"कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील सरकार न्याय देईल. त्याला क्विंटलप्रमाणं न्याय दिला जाईल. शेतकऱ्यांच्या मागं सरकार खंबीरपणे उभं राहिलं. अवकाळी पावसामुळंग्रस्त शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, जसे पंचनामे पूर्ण होतील शेतकऱ्यांना आपण मदत देणार आहोत, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने