शासकीय कार्यालये दुसऱ्या दिवशीही ओस!

 जळगाव : राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन (OPS) योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील सुमारे ४५ हजार कर्मचारी संपावर गेले आहेत.मार्च महिना महसूल वसुलीचा असल्याने शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. मार्चअखेरची कामेही होत नसल्याने कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडे परत जाण्याचे चित्र आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा संपाचा बुधवारी (ता. १५) दुसरा दिवस होता. बुधवारीही कर्मचारी नसल्याने शासकीय कार्यालये ओस पडली होती. केवळ अधिकारी होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक कर्मचाऱ्यांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘हमारी मांगे पुरी करो’, ‘कोण म्हणतं देणार नाही’, ‘घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘हम सब एक है’, ‘हमारी युनियन हमारी ताकद’, ‘राज्य कमचारी संघटनेचा विजय असो’, आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर जिल्हा परिषद महासंघ समितीच्या निर्णयानुसार विविध विभागांच्या संघटनांनी हा संप पुकारला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, मस्त्य विभाग, बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, आरोग्य कर्मचारी, शिक्षक कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला आहे.



‘जीएससी’त कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कर्मचारी बुधवारी संपावर होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र काम केले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने काळ्याफिती लावून रुग्णसेवा केली. राज्य वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयातील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. बुधवारी सकाळी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणा दिल्या. विजय जगताप, गोपाल साळुंखे, दिलीप मोराणकर, जे. एस. गवळी, समीर देवसंत, गणेश घुगे, नरेंद्र पाटील, गणेश धनगर, सूर्यकांत वसावे, देविदास गायकवाड, शीतल राजपूत, विजया बागूल, मंगेश जोशी,

क्षीतिज पवार, श्‍यामकांत दुसाने, विलास वंजारी, जे. एस. शिंदे, अनिल अवसरमल, संतोष टकले, प्रमोद वानखेडे, तुषार निळे, शिवकुमार पदरे, साहेबराव कुडमेथे, अनिल कापुरे, उमेश टेकाळे, गोपाल बहुरे, प्रकाश पाटील, किशोर आव्हाड, गणेश धनगर, प्रवीण डांगे आदी संपात सहभागी झाले आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनच्या कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शवून काम केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा, म्हणून राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने बाहेरून पाठिंबा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने