कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे गरजेचे

कोल्हापूर: पूरबाधित २० गावांऐवजी पंचगंगा नदीच्या पूर्व आणि दक्षिणेकडील शहराशेजारी असणाऱ्या कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मुडशिंगी, गांधीनगर-वळिवडे, गिरगाव, वाशी आणि वाडीपीर या १२ गावांचा समावेश करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, असा प्रस्ताव ‘क्रिडाई’तर्फे शासनाला देण्यात आला आहे.कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून हद्दवाढीची मागणी केली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर शहर हद्दवाढीत २० गावे प्रस्तावित आहेत. या २० गावांपैकी काही गावांत पूर येतो. त्यामुळे त्यांचा शहराशी संपर्क तुटतो.

त्या गावांत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पूर्व आणि दक्षिणेकडे असणारी १२ गावे हद्दवाढीत घेतली तर पुराचा फटका बसत नाही. याशिवाय, तेथे शहरातील पाणीपुरवठा आणि बससेवाही सुरू आहे.शहरालगत असणारी व भौगोलिक संलग्नता असलेली आणि पूररेषेत समाविष्ट नसणारी १२ गावे प्रामुख्याने हद्दवाढीत घेतली पाहिजेत. पंचगंगा नदीच्या उत्तर आणि पश्‍चिम दिशेला असणाऱ्या गावांमधील बहुतांश भाग पुराच्या पाण्याखाली जातो.पूरबाधित गावे हद्दवाढीत समाविष्ट केल्यास त्यातून हद्दवाढीचा उद्देश सफल होणार नाही. याशिवाय, या गावांतील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने लोकांचा हद्दवाढीला विरोध होऊ शकतो. त्यामुळे शहराशेजारील आणि पूरबाधित नसणारी गावे घेतल्यास हद्दवाढीचा हेतू सफल होऊन नागरीकरणाला चालना मिळणार आहे.



प्राधिकरण असफल

शहराच्या हद्दवाढीला पर्याय म्हणून १६ ऑगस्ट २०१७ ला कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या ४२ गावांचा समावेश करून ‘कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण’ स्थापन केले. ज्या उद्देशासाठी हे प्राधिकरण स्थापन केले, तो उद्देश सफल झाला नाही.त्यामुळे कोल्हापूर शहराचा विकास खुंटला व प्राधिकरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली असल्याचेही ‘क्रिडाई’च्या प्रस्तावात नमूद केले आहे.

... तर शहराची लोकसंख्या साडेआठ लाखांवर जाईल

२०११ च्या जनगणेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या पाच लाख ५० हजारांवर आहे. प्रस्तावित १२ गावांची लोकसंख्या एक लाख ६० हजार ७१८ असून, एकूण लोकसंख्या सात लाख १० हजार ७१८ इतकी होणार आहे.२०११ च्या जनगणनेनुसार यात २० टक्के वाढ धरल्यास हद्दवाढीनंतर शहराची एकूण लोकसंख्या आठ लाख ५२ हजार ८६० इतकी होणार आहे.‘शहर हद्दवाढीसाठी प्रामुख्याने २० गावांऐवजी १२ गावे घेतली पाहिजेत. यातील अनेक गावांना शहरातील सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे ‘क्रेडाई’ने दिलेल्या प्रस्तावानुसार हद्दवाढ झाली तर निश्‍चितपणे शहरासह हद्दवाढीत येणाऱ्या प्रत्येक गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने