आता राजन साळवी यांच्या कुटुंबाला एसीबीची नोटीस; ठाकरे गटाला आणखी एक धक्का

मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांनी एसीबीने नोटीस धाडली आहे. राजन साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. साळवी यांच्या कुटूंबाला 20 मार्च रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधी राजन साळवी हे स्वत: तीन वेळा एसीबी चौकशीला हजर राहिले आहेत, तसेच त्यंच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी करण्यात आली.गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. आतापर्यंत तीन वेळा राजन साळवी अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज काय? असा प्रश्न राजन साळवींनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.



काय म्हणाले साळवी?

स्वत: राजन साळवी यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. आज सकाळी माझी पत्नी अनुजा साळवी, मोठे बंधू दीपक साळवी आणि वहिनी अनुराधा साळवी यांना एसीबीची नोटीस आली. 20 मार्च रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कुटुंबीयांना नोटीस पाठवणे ही दुर्दैवी बाब आहे, असे राजन साळवी म्हणाले.ते पुढे म्हणाले की, मी सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालेलो आहे. राजन साळवी काय आहे हे संपूर्ण मतदारसंघाला, जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही चौकशीला मी घाबरत नाही. पहिल्याच दिवशी जाहीर केले होते चौकशीला सहकार्य करणार आणि करतोय.उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना टार्गेट केले जातेय का? असे विचारले असता ते म्हणाले की, हे सत्य आहे. कारण वैभव नाईकला पहिली नोटीस आली, दुसरी नोटीस मला आणि तिसरी नोटीस नितीन देशमुख यांना आली.

आज शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांना नोटीस पाठवल्या जात आहेत. भाजपमध्ये अनेक मंडळींची नावे माध्यमांकडेही आहेत, पण त्यांना नोटीस येत नाही. फक्त भाजपमध्ये गेले की वाशिंग मशिनमध्ये घालून स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी अशी सरकारची भूमिका आहे.केंद्रात, राज्यात त्यांचे सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत, आणि अशा पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. पण निश्चितपणे भविष्यात ही महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवून देईल, असा इशाराही राजन साळवी यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने