आदमापूर येथे जागरानिमित्त भाकणूक ; लाखो भाविकांना महाप्रसादाचा लाभ

गारगोटी : महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरानिमित्त रविवारी पहाटे कृष्णात डोणे (वाघापूर) यांची भाकणूक झाली. त्यांनी वर्तमान स्थितीतील परिस्थितीवर भविष्यवाणी कथन केली. यापूर्वी धनगरबांधवानी वालंगवादन व हेडाम खेळ सादर केला. या वेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.रविवारी दिवसभरात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादासाठी दहा टन तांदूळ, चार टन गहू आणि चार टन गूळ यासह १८ टन धान्याचा वापर करण्यात आला. यात्रेनिमित्त होणारी वाढती गर्दी लक्षात घेत देवस्थानने बारा काहिलीचा प्रसाद तयार केला होता. तसेच प्रसाद वाटपाचे योग्यरित्या नियोजन केले होते.




सकाळपासून भाविकांनी महाप्रसादासाठी गर्दी केली होती. दिवसभरात भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मंडप घातले होते. मंडपामध्ये प्रसादासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घरी प्रसाद नेणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता.बिद्री साखर कारखाना, गोकुळ दूध संघ, स्वयंसेवी संस्था व भागातील ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या टँकरने महाप्रसादाच्या ठिकाणी पाणीपुरवठा केला होता. यात्रा सुरळित पार पाडण्यासाठी व महाप्रसाद वाटपासाठी विविध जिल्ह्यातील ४०० भक्तांनी स्वयंसेवक म्हणून चांगली भूमिका बजावली.

मोफत दुचाकी दुरुस्ती सेवा

भाविकांच्या सेवेसाठी मीनल ऑटोमोबाईल व मुरगूड मेकॅनिकल टू व्हिलर असोसिएशनने मोफत दुचाकी दुरुस्ती व पंक्चर मोफत काढून देण्याचा उपक्रम राबविला. यात दीपक माने, यशवंत भाट, अमोल पाटील, गोविंद मोरबाळे, संग्राम ढेरे, विनायक भोसले, अशोक मांगले, शरद पाटील, अमोल मांगले आदींनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने