'चुकीला माफी नाही'; अदानी प्रकरणावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य

 नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  पहिल्यांदाच तपास यंत्रणा आणि अदानी प्रकरणावर खुलेपणाने बोलले आहेत. सीबीआय आणि ईडी  सारख्या तपास यंत्रणा निष्पक्षपणे काम करत आहेत, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना शाह म्हणाले, 'विरोधी नेत्यांचे सर्व आरोप निराधार आहेत. जर त्यांना तपास यंत्रणांच्या कामावर शंका असेल तर ते त्यांना न्यायालयात आव्हान देऊ शकतात.'



तर त्याची चौकशी व्हायला नको का?

या तपास यंत्रणा काही न्यायालयाच्या वर नाहीत. कोणतीही नोटीस, एफआयआर आणि आरोपपत्र यांना न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. कोर्टात जाण्याऐवजी ते (विरोधी नेते) बाहेर का ओरडत आहेत? मला जनतेला विचारायचं आहे, जर कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची चौकशी व्हायला नको का? ही सर्व प्रकरणं भाजप सरकारच्या काळात नव्हे, तर यूपीए सरकारच्या काळात नोंदवण्यात आली होती. याकडंही शाहांनी लक्ष वेधलं.

नेत्यांना न्यायालयात जाण्यापासून कोण रोखत आहे?

शाह पुढं म्हणाले, 'काँग्रेसच्या  नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत 12 लाख कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप झाले होते, तेव्हा परिस्थिती निवळण्यासाठी सरकारनं सीबीआयमार्फत गुन्हा दाखल केला होता. मनी लाँड्रिंगचं प्रकरण असल्यास ईडी त्याची चौकशी करण्यास बांधील आहे.' तपास यंत्रणा विरोधी नेत्यांना टार्गेट करत असल्याच्या आरोपाबाबत शाह म्हणाले, 'या नेत्यांना न्यायालयात जाण्यापासून कोण रोखत आहे? त्यांच्या पक्षात आमच्यापेक्षा चांगले वकील आहेत.'

'चूक झाली असेल तर कुणालाही सोडू नये'

अदानी समूहाविरुद्धच्या  चौकशीबाबत विचारले असता शाह म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानं निवृत्त न्यायाधीशांसह दोन सदस्यीय समिती स्थापन केली असून प्रत्येकानं जाऊन त्यांच्याकडं जे काही पुरावे आहेत ते सादर करावेत. चूक झाली असेल तर कुणालाही सोडू नये, असंही ते म्हणाले. प्रत्येकाचा न्यायप्रक्रियेवर विश्वास असायला हवा. लोकांनी बिनबुडाचे आरोप करू नये. कारण, ते जास्त काळ चालणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने