High Court चा माजी पंतप्रधानांना मोठा दिलासा; अटक वॉरंट 2 आठवड्यांसाठी रद्द!

बलुचिस्तान: माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे  अध्यक्ष इम्रान खान  यांना बलुचिस्तान उच्च न्यायालयाकडूनतात्पुरता दिलासा मिळाला आहे.बीएचसीनं शुक्रवारी इम्रान खान यांच्याविरुद्ध जारी केलेलं अटक वॉरंट दोन आठवड्यांसाठी स्थगित केलं. इम्रान यांच्यावर सरकारी संस्थांविरुद्ध जनतेला भडकवल्याचा आरोप आहे. यामध्ये स्थानिक न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय.पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्वेटा पोलिसांचं पथक इम्रान खान यांना अटक करण्यासाठी लाहोरमधील निवासस्थानी पोहोचलं, तेव्हा न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली. क्वेटाच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी बिजली घर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पीटीआय प्रमुखाविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.



राष्ट्रीय संस्थांची बदनामी केल्याप्रकरणी इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अब्दुल खलील करक नावाच्या नागरिकाच्या तक्रारीवरून बलुचिस्तान पोलिसांनी  पीटीआय अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बीएचसीचे न्यायाधीश जहीर-उद-दीन काकर यांनी पीटीआय प्रमुखाच्या वतीनं इन्साफ लॉयर्स फोरमच्या (ISF) इक्बाल शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. हा गुन्हा बिजली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला नाही, असं याचिकेत नमूद करण्यात आलं. यावेळी एफआयआर रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली. वॉरंट रद्द करताना न्यायमूर्ती काकर यांनी बलुचिस्तानचे पोलिस प्रमुख, बिजली पोलिस स्टेशनचे एसपी आणि स्टेशन हाऊस ऑफिसर यांनाही समन्स बजावले. ही सुनावणी दोन आठवडे पुढं ढकलण्यात आल्याचं वृत्त जिओ न्यूजनं दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने