भारतीय कुस्ती संघटनेला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका!

दिल्ली: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यासह संकटात सापडलेल्या भारतीय कुस्ती संघटनेला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका देण्यात आला आहे. अनूज कुमार, चंदर मोहन, विजय, अंकित व सचिन मोर या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावलेल्या पाच कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीत खेळू द्या, असा आदेश उच्च न्यायालयाकडून याप्रसंगी देण्यात आला आहे.न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांच्या विशेष सुनावणीत महत्त्वाचा निर्णय घेतला. आशियाई क्रीडा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा एप्रिल महिन्यात ९ ते १४ या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन भारतीय कुस्ती संघटनेकडून करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा १० व ११ मार्च रोजी होणार आहे.



अनुज कुमार याने २०२२मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक हे महत्त्वाचे ठरते. याशिवाय चंदर मोहन, विजय, अंकित व सचिन मोर या कुस्तीपटूंनीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांवर मोहोर उमटवली आहे. यानंतरही पाचही कुस्तीपटूंना डावलण्यात आले आहे.याचिकाकर्त्यांकडून असे सांगण्यात आले आहे की, आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीची निवड चाचणी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण यामध्ये चमकदार कामगिरी केल्यास पॅरिस ऑलिंपिकमध्ये पात्र ठरण्यासाठी बळू मिळू शकणार आहे.उच्च न्यायालयाकडून भारतीय कुस्ती संघटनेच्या रेकॉर्डवर लक्ष टाकण्यात आले. त्या वेळी समजले की, निवड चाचणीसाठी अनेक पदकविजेत्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामुळे आता उच्च न्यायालयाने मंत्रालय व भारतीय कुस्ती संघटना यांना यामागील कारण विचारले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने