आय...लव्ह...यू...नागपूर ! सौंदर्यीकरण, रोषणाईच्या प्रेमात पडले नागरिक

नागपूर : वर्धा मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिव्हिल लाईन्स परिसरातील आकर्षक रोषणाईतून जाताना नकळतपणे तरुणाईच्या ओठातून ‘आय...लव्ह...यू...नागपूर’ हे शब्द बाहेर पडत आहे.झाडांवर केलेली रंगबिरंगी आकर्षक रोषणाई, पथदिव्यांची आरास अन् हिरवळीवर फोटोसेशनसाठी केलेल्या गर्दीमुळे नागपूरकर पुन्हा एकदा शहराच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे.जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शहराचा संपूर्ण कायापलट करण्यात आला आहे. वर्धा मार्ग, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडील रस्ते जणू कार्निवल असल्यासारखे झगमगाटात न्हाऊन गेले आहे. आता या रस्त्यांवरील रंगबिरंगी रोषणाई, पथदिव्यांनी उजळलेल्या



आय...लव्ह...यू...नागपूर !

रस्त्यांची नागपूरकरांना भुरळ पडली आहे. रोषणाईत झाडांच्या पानांचा बदलत असलेला रंग, आकर्षक फुलांच्या झाडावर पडलेली श्वेत प्रकाशाची किरणे, लॉन गवतावर दवबिंदुप्रमाणे असलेल्या पाण्याच्या थेंबातून चकाकणारे विद्युत दिवे,या सर्वांनी नागपूरकरांना अक्षरशः वेड लावले आहे. वर्धा मार्ग, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडील रामगिरी व इतर भागात नागरिक फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. अनेक जण कुटुंबीयांसह फोटो काढण्यासाठी या मार्गावर येत आहेत. त्यामुळे सिव्हिल लाईन्ससारख्या रात्री वर्दळ नसलेल्या भागातही गर्दी होत आहे.

मोबाईलच नव्हे तर अनेकजण कॅमेरे घेऊन येथे फोटोसेशनसाठी येत आहे. विमानतळ परिसरातही नागरिक कारने फोटो काढण्यासाठी जात असल्याने शनिवारी रात्री वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली.अखेर पोलिसांना काही नागरिकांना परत पाठवावे लागले. वर्धा मार्गावर मेट्रोच्या पिलरवर करण्यात आलेली रोषणाई नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. एकूणच एवढे सुंदर नागपूर कधी बघितले नाही, असे शब्द आपसूक ओठातून बाहेर पडत आहे. जी-२० निमित्त का होईना, परंतु नागपूरचे हे आकर्षक रुप पुढील अनेक वर्षे नागरिकांच्या स्मरणात कायम राहील, असे एका नागरिकाने नमूद केले.

प्री-वेडिंग फोटोशूटही

शहरातील आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघालेल्या रस्त्यांवर नुकताच लग्न जुडलेले तरुण-तरुणी प्री-वेडिंग फोटो शूट करतानाही दिसून येत आहे. विशेषतः विमानतळ व सिव्हिल लाईन्स येथील भागात काही तरुण-तरुणीने प्री-वेडिंग फोटो शूट केल्याचे अनेकांनी बघितले. शहरात केलेली आकर्षक रोषणाई कायम राहावी, असे मतही काही तरुणांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने