संसदेत विरोधकांचा काळा दिवस

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या अपात्रतेवरून संतप्त असलेल्या काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आज काळा दिवस पाळून सरकार विरोधात संसदेमध्ये आणि संसदेबाहेर आक्रमक शक्तीप्रदर्शन केले. काळे कपडे परिधान केलेल्या विरोधकांनी अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची मागणी करताना घातलेल्या गोंधळामुळे संसदेत कामकाज होऊ शकले नाही.

संसदेमध्ये काळा दिवस पाळण्याचे काँग्रेसतर्फे कालच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सोनिया गांधींसह सर्व खासदार काळे कपडे परिधान करून संसदेत दाखल झाले होते. तर, काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनीही काळा दिवस पाळला. यामध्ये १७ विरोधी पक्षांचा समावेश होता. लोकसभेचे कामकाज सुरू होताच मोदी-अदानी प्रकरणावर विरोधांनी घोषणाबाजीला सुरवात केली.यामध्ये एका खासदाराने लोकसभाध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन कागद भिरकावले. तर अन्य एका खासदाराने काळे कापड फडकाविले. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या लोकसभाध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना आपापल्या आसनावर जाण्याचे आवाहन करून कामकाज दुपारी चारपर्यंत तहकूब केले. तर, राज्यसभेमध्येही असाच गोंधळ होऊन कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब झाले होते.



दरम्यान, काळा दिवस पाळणाऱ्या विरोधकांनी आक्रमकता संसदेच्या बाहेरही कायम राहिली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, सत्ताधाऱ्यांनीच संसद बंद पाडणे हा लोकशाहीसाठी काळा अध्याय असल्याचे ट्विट करून एकजूट झालेले विरोधी पक्ष जेपीसीच्या मागणीवर ठाम राहतील, असे स्पष्ट केले होते.त्यापार्श्वभूमीवर संसदेतील रणनितीसाठी झालेल्या विरोधकांच्या बैठकीमध्ये संसद अधिवेशनात पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसचा सहभाग दिसून आला. यानंतर विरोधकांनी संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

यामध्ये काँग्रेस सोबतच द्रमुक, समाजवादी पक्ष, बीआरएस, माकप, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेसचे खासदार सहभागी झाले होते. नंतर सर्व विरोधकांनी संसदेपासून राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकापर्यंत मोर्चा काढून जेपीसीची मागणी करताना जोरदार घोषणाबाजी केली.

झुकविण्यासाठी संस्थांचा वापर: खर्गे

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर कडाडून हल्ला करताना राहुल गांधींना दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व विरोधी पक्षांचे आभार मानले. काळ्या कपड्यातील आंदोलनाबाबत खर्गे म्हणाले, की पंतप्रधान मोदी लोकशाही नष्ट करत आहे.आधी घटनात्मक संस्थांना नष्ट केले. त्यानंतर राज्यांमध्ये विरोधकांची सरकारे पाडून पंतप्रधानांनी आपली सरकारे आणली आणि न घाबरणाऱ्यांना झुकविण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला. अदानी प्रकरणात सरकार संयुक्त संसदीय समिती नेमण्यासाठी घाबरत आहे याचाच अर्थ ‘दाल मे कुछ काला है’, असा टोला खर्गे यांनी लगावला.राहुल गांधींनी कोलार (कर्नाटक) मध्ये भाषण केले, खटला गुजरातमध्ये दाखल केला. न्यायालयाच्या निकालानंतर मोदी सरकारने लोकसभाध्यक्षांना सांगून राहुल गांधींना अवघ्या काही मिनिटांमध्ये अपात्र ठरवल्याचीही तोफ खर्गे यांनी डागली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने