एजंट एक, पंटर अनेक, कारवाई शून्य; रेल्वे स्थानकातील तिकीट काळाबाजार रोखणार कोण?

कोल्हापूर : रेल्वेचे तिकीट हवे असल्यास मोबाईल ॲप चांगल्या प्रकारे वापरणाऱ्यांना आरक्षणातून तिकीट मिळू शकते. मात्र तिकीट न मिळालेला प्रवासी वर्ग रेल्वेस्थानकांवर तत्काळमध्ये तिकीट घेण्यास रांग लावतो. मात्र, एजंटाकडून आव्वाच्या सव्वा पैसे मोजून मोजक्यांना तिकीट मिळवून दिले जाते. रांगेतील सामान्य प्रवाशांची निराशा होते. तिकिटांचा काळा बाजार करणारा एक मुख्य एजंट त्याच्या हाताखाली दहा बारा पंटराची टोळी येथे कार्यरत आहे. या एजंटाच्या टोळीला रोखण्यासाठी पुढाकार घेणार कोण, असा प्रश्‍न आहे.एका रेल्वेत किमान ७०० ते ८०० आसण क्षमता असते. मुंबईला जाणाऱ्या तीन गाड्यापैकी सह्याद्री गाडी बंद झाली. त्यामुळे त्या रेल्वेच्या प्रवाशांचा ताण दोनच रेल्वेवर आला. दोन्ही रेल्वेला गर्दी वाढती असल्याने आरक्षणाची तिकिटे लगेच संपतात. मोजक्यांना आरक्षण मिळते. बहुतांशजणांना आरक्षणाचे तिकीट मिळत नाही. अशीच स्थिती अन्य दीर्घपल्ल्याच्या गाड्यांची आहे.

तेव्हा अनेक प्रवासी तत्काळ तिकीट खिडकीजवळ पहाटे तीनपासून रांग लावतात. खिडकी सकाळी दहाला सुरू होते. तेव्हा पहिल्या पाच ते सात लोकांना तिकीट मिळते. पहाटेपासून रांगेत थांबलेल्या बहुतांशजणांना तिकीट मिळत नाही. कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील रेल्वे स्थानकावर एकाच वेळी आनलाईन आरक्षण तिकीट मागणी नोंदवली जात असल्याने पहिल्या दहा पंधरा मिनिटात सर्व तिकिटे संपून जातात. जो आनलाईन हाताळण्यात तरबेज असतो त्याला तिकीट मिळते.



एजंटाची बेरकी खेळी

तत्काळचे तिकीट काढण्यासाठी एजंटाने नियुक्त केलेले लोक पहाटे तीनपासून रांगेत थांबतात. तिकीट खिडकी खुली झाली की, एजंटाचे लोक आपल्या जागेवर जो प्रवासी एजंटाकडून आला त्याला उभे करतात. त्यामुळे सुरुवातीची तिकिटे एजंटाकडून आलेल्यांना मिळतात. काही तिकिटे एजंट सर्वाधिक रक्कम देणाऱ्या आपल्या नेहमीच्या प्रवाशांना देत कमाई करतो. एजंटाची खेळी इतकी भक्कम आहे की, कोणताही पुरावा राहणार नाही. यासाठी तत्काळसाठी रांग अचानक दहा वाजता हलवली जाते. सीसीटीव्हीच्या कक्षेत पहिल्यांदा कोण आले हे लक्षात येऊ नये यासाठीही खबरदारी घेतली जाते. यातून रेल्वेतील आतील यंत्रणा या एजंटाला सहकार्य करीत असल्याची चर्चा आहे.

अपवाद वगळता तक्रार नाही

या एजंटगिरीविषयी यापूर्वी अनेक तक्रारी झाल्या. मात्र कोल्हापूर सोडाच. पुणे विभागातील रेल्वेचे अधिकारही याला मज्जाव करू शकले नाहीत. या एजंटाचे हात दिल्लीपर्यंत आहेत, त्याला खासदार, मंत्रीही रोखू शकत नाहीत. अशा उघड बतावण्या त्याच्याच काही लोकांनी इतक्या जबरदस्त पद्धतीने पसरवल्या की, अपवाद वगळता तक्रारीला कोणी पुढे कोणी येत नाही. हे गेल्या वीस वर्षांतील वास्तव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने