बॉलीवूड अभिनेत्रींच्या मालमत्तेची हवा सगळीकडेच पण त्या चॅरीटी किती करतात?

मुंबई:  आज जागतिक महिला दिन. महिलांची सर्व क्षेत्रात आज वेगळी ओळख दिसून येते. बॉलीवूडपासून ते सामाजिक कार्यांपर्यंत प्रत्येक क्षेत्रांत महिलांनी उंची गाठली आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्रींबाबत बोलायचे झाल्यास त्यांचं सौंदर्य, त्यांची मालमत्ता आणि सोशल मीडिया पोस्ट यावर कायमच चर्चा रंगत असते. मात्र त्या किती चॅरीटी करतात हे तुम्हाला माहितीये काय? आज जागतिक महिला दिनी बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्या दान करण्यात अग्रेसर आहेत.

1) प्रियंका चोप्रा

चॅरिटेबल इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राची उपस्थिती नेहमीच चर्चेत असते. नुकतीच सरोगसीद्वारे आई झालेली ही अभिनेत्री मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी काम करत आहे. ती 2010 मध्ये युनिसेफची राष्ट्रीय राजदूत होती आणि त्यांच्या सेव्ह द गर्ल मोहिमेशीही ती जोडलेली आहे. याशिवाय ती प्रियांका चोप्रा फाऊंडेशन नावाची एनजीओची मालकीण आहे. तिच्या उत्पन्नाचा एक भाग फाउंडेशनमध्ये जातो, असे अहवाल सांगतात.

2) ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चनने अनेक सेवाभावी संस्थांना दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. ही अभिनेत्री पेटा इंडियाची समर्थक आहे आणि तिचे प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे. त्यासाठी ती चर्चेत असते. तिने आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाला डोळे दान करण्याचे वचनही दिले आहे. नोव्हेंबर 2004 मध्ये, अभिनेत्रीने भारतातील गरीबांना मदत करण्यासाठी ऐश्वर्या राय फाउंडेशनची तिने स्थापना केली.



3) दीपिका पदुकोण

मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या आहे. सेलिब्रेटी नेहमीच आनंदी असतात असे आपण मानतो, पण असे नाही. दीपिका पदुकोण नैराश्याशी झुंजत होती याचा अंदाज अनेकांना नसेल? मात्र त्यातून तिने स्वत:ला सावरले. तिने टेलिव्हिजनवर तिच्या नैराश्याबद्दल सांगितले आणि ‘लिव्ह लव्ह लाफ’ फाऊंडेशनची स्थापना केली, जी निराश झालेल्यांना मदत करण्यासाठी समर्पित आहे.

4) विद्या बालन

विद्या बालन ही केवळ एक अभिनेत्रीच नाही तर समाजकार्यातही ती अग्रेसर आहे. महिलांना मदत करण्याच्या तिच्या प्रयत्नांसाठीही ती ओळखली जाते. विद्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करते. ती मुलांसाठी भारतीय आहार कार्यक्रमात भाग घेऊन मुलांना मदत करते.या अभिनेत्रींच्या सामाजिक कार्याबाबत बऱ्याच लोकांना कल्पना नाहीये. पण त्यांच्या सामाजिक कार्यातून त्या अनेकांची मदत करत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने