महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोरांची पहिली भेट ऐतिहासिक का ठरली?

दिल्ली: इतिहासात डोकावून पाहिलं तर महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या नावांशिवाय स्वातंत्र्य संग्राम अपूर्ण आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधी आणि टागोर यांचे भरीव योगदान आहे. असं मानलं जातं की, हे दोघेही भिन्न विचार सरणीचे होते. या दोघांची पहिली भेट कुठे, कधी झाली याचेही किस्से प्रसिद्ध आहेत. आज त्याबद्दल जाणून घेऊयात.रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट आजच्याच दिवशी म्हणजेच ६ मार्च १९१५ रोजी झाली होती. एकमेकांबद्दलचा आदर त्यांच्या मनात भरून वाहत होता. या दोघांच्या पहिल्या भेटीचे स्वतःचे महत्त्व आहे. गांधीजी आणि टागोर यांची भेट शांतीनिकेतन येथे झाली होती.

गांधीजींची शांतिनिकेतनची ही पहिली भेट नव्हती हे विशेष. गांधीजींची पहिली भेट १७ फेब्रुवारी १९१५ रोजीच शांतीनिकेतनला झाली होती. पण योगायोगाने टागोर त्यावेळी तिथे नव्हते. त्यानंतर दोघांची भेट ६ मार्चला झाली.दोघेही वसाहतवाद आणि भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण एकीकडे गांधींचे कार्यक्षेत्र राजकीय होते. तर दुसरीकडे टागोर हे साहित्यिक होते. अनेक मुद्द्यांवर एकमत नसतानाही ते एकमेकांचे चाहते होते. टागोरांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली होती. तर गांधींजींनी त्यांना गुरुदेव म्हटले.



या भेटीचा दुवा इंग्रज अधिकारी ठरला

महात्मा गांधी आणि टागोर यांची भेट घडवण्यात एका इंग्रज अधिकाऱ्याचा हात होता. ब्रिटीश अधिकारी चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज असे त्याचे नाव. महात्मा गांधींना शांतीनिकेतनमध्ये राहण्यास सांगणारा आणि त्यांची सगळी व्यवस्था करणारा हाच अधिकारी होता.  त्यानेच गांधीजींना आठवडाभर शांतीनिकेतनमध्ये राहण्यासा सांगितले होते.  गांधीजींचे निकटवर्तीय काका केळकर यांनी या भेटीबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्या अधिकाऱ्यामूळे गांधीजी शांतीनिकेतनमध्ये थांबले आणि तो दुग्धशर्करा योग जुळून आला. या भेटीबद्दल काका केळकर म्हणतात की, ‘भारतमातेचे दोन पुत्र पहिल्यांदा कसे भेटतात हे जाणून घेण्यासाठी माझ्यासह सर्व शिक्षकांना खूप उत्सुकता होती.’त्या आठवडाभराच्या काळात रविंद्रनाथ टागोर शांतीनिकेतन मध्ये नव्हते. त्यांच्या भेटीसाठी गांधीजी तेथे वाट बघत थांबले. ते एक आठवडा तेथे राहिले. तो आठवडा कायमचा लक्षात रहावा यासाठी या संस्थेत दरवर्षी १० मार्च या दिवशी “गांधी दिवस” साजरा करण्यात येतो. या दिवशी नोकर आणि स्वयंपाकी सुट्टी घेतात. तर विद्यार्थी आणि शिक्षक त्यांची सर्व कामे पार पाडतात.

कशी होती भेट

काका काळेकर सांगतात की, रवींद्रनाथ टागोर एका सोफ्यावर बसले होते. ते अतिशय उंच होते, त्यांचे चंदेरी केस आणि लांब दाढी आकर्षक वाटत होती. त्यांचे कपडे म्हणजे लांब गाऊन.या वेषात ते एखाद्या सिंहासारखे रुबाबदार दिसत होते. त्यांच्यासमोर गांधीजी अगदी किरकोळ उंची आणि साध्या धोती कुर्त्यामध्ये होते. त्यावर त्यांनी काश्मिरी टोपी घातली होती. ती भेट जशी उंदीर-सिंहाची जोडीच दिसत होती.दोघे प्रचंड आदराने एकमेकांकडे बघत होते. रवीबाबू सोफ्यावरून उठले त्यांनी गांधीजींना बाजूला बसायचे निमंत्रण दिले. पण आपल्या बापूंची साधी राहणी आणि वागणे सुद्धा साधेच. बापू बसले जाऊन खाली सतरंजीवर आणि मग रवीबाबूंना सुद्धा जमिनीवरच बसावे लागले.

या भेटीत गांधीजींनी शांतिनिकेतनच्या कामात खूप रस दाखवला. त्यांनी तिथे काही बदलही टागोरांना सुचवले. शांतीनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच त्यांची कामे स्वतः करायला शिकले पाहिजे. अशी त्यांची इच्छा होती. शांतिनिकेतनमध्ये छोट्या कामांसाठी नोकर ठेवण्याची गरज नाही, असा सल्ला त्यांनी दिला.या भेटी नंतर अनेक वर्षे दोघे भेटत राहिले, पत्र पाठवत राहिले, एकमेकांच्या कामा बद्दल प्रतिक्रिया देत राहिले. बऱ्याच वेळा जे पटलं नाही त्यावर पण चर्चा करू लागले. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने