"...तर गावागावात गोध्रा, रेल्वेचा डब्बा आतून पेटवला" ; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोध्रा जळीतकांडाविषयी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला भाजपला मतदान न करण्याचे देखली आवाहन केले आहे. लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी कंबर कसली असून भाजपवर प्रहार केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "मुस्लीम समाज कमळाला १०० टक्के मतदान करणार नाहीत, हे मला माहित आहे. भाजपला मतदान केले तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही."



यावेळी प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर देखील गंभीर आरोप केला आहे. "रेल्वेचा डबा बाहेरून जळत नाही. तुम्ही काहीही करा, पेट्रोल टाका, डिझेल टाका पण तो डब्बा बाहेरून जळत नाही. त्याला आतून पेटवावा लागला. डब्बा आतून पेटला म्हणजे जो कुणी आत बसला आहे त्यानेच पेटवला असेल. त्यामुळे आपण लक्षात घेतले पाहिजे हे फसवेगिरीचं मोठं षडयंत्र झालं आहे", असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

नरेंद्र मोदी यांचे सरकार असताना गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा दंगल झाली होती. याप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन गुजरात सरकारला क्लीन चिट देण्यात आली आहे. गुजरात विधानसभेत नानावटी मेहता आयोगाने आपला अहवाल सादर केला होता. 'गोध्रा ट्रेन जळल्यानंतर झालेल्या दंगली या पूर्वनियोजित नव्हत्या,' असं नानावटी मेहता आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं होतं.या अहवालात नरेंद्र मोदींसह इतर मंत्र्यांना क्लीन चीट देण्यात आली होती. गोध्रा ट्रेन जळीतकांडानंतर झालेली दंगल पूर्वनियोजित नव्हती असं आयोगाने आपल्या अहवालात सांगितलं आहे. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारला देखील क्लीन चीट देण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने