भाव घसरल्याने कोथिंबीर, मेथीचे शेतकऱ्यांकडून मोफत वाटप

नाशिक: कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच नाशिक बाजार समितीत लिलावात शुक्रवारी  कोथिंबीर आणि मेथीला शेकडा १०० रुपयाचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी हतबल होऊन लिलावातून भाजी काढून घेत दिंडोरी नाका येथे अक्षरक्ष: फुकट नागरिकांना भाजीचे वाटप केले. यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती, तर दिंडोरी नाका परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.नाशिक बाजार समितीत लिलावामध्ये पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी व कोथिंबीर या पालेभाज्यांना प्रतिशेकडा शंभर रुपयाचा भाव मिळाला. म्हणजेच प्रतिजोडी एक रुपया भाव मिळाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी दिंडोरी नाका परिसरात नागरिकांना भाजीचे फुकट वाटप केले.




याबाबत शेतकरी संतोष बाबूराव बरकडे (ता. दिंडोरी) व भूषण सुभाष आथरे (रा. निफाड) म्हणाले, की सदरचे पीक येण्यासाठी त्यांना 25 हजार रुपये खर्च आलेला असताना आता मात्र लिलावात त्याचे फक्त शंभर रुपये हातात येत आहे.कमीत- कमी १० रुपये प्रति जोडी भाव अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र एक रुपया प्रति जोडी भाव मिळत आहे. मात्र किरकोळ विक्रेते यास पालेभाज्यांची दहा ते पंधरा रुपयांना विक्री करत आहे. बाजार समितीत पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात अवाक वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे व्यापारी सांगत आहे.

हमीभावाचे काय

कांद्यासारख्या काही दिवस टिकणाऱ्या पिकास केंद्र शासन व राज्य शासन नाफेडमार्फत खरेदी करून काही प्रमाणात हमीभाव देऊ शकते. मात्र पालेभाज्यांबाबत अशी कुठलीही तजवीज कुणालाही करता येत नाही. अथवा त्याची साठवणूक करता येत नाही. अथवा त्याच्या विक्रीसाठी थांबता येत नाही ,ही शोकांतिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने