गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला अन् महाराष्ट्रावर मोठं संकट आलं; भाजप आमदाराचा जोरदार प्रहार

भिलार : आपण यशवंतराव चव्हाण  यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात आपला पक्ष त्यांनी वाढवला; पण 40 वर्षे एकहाती पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.सारी विकास केंद्रे बारामतीला नेली, कर्मवीर, यशवंतराव या संस्थांबरोबर त्यांनी औंधचे संस्थानही ताब्यात घेतलं. आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे, असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केला.भिलार (ता. महाबळेश्वर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराचे समारोप प्रसंगी आमदार गोरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रवी अनासपुरे हे उपस्‍थित होते.

आमदार गोरे म्हणाले, 'ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला, ती मुख्यमंत्री साहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्‍या रूपाने महाराष्ट्राने पाहिला. देवेंद्र फडणवीस  यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे  आणि अजित पवार  यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आम्ही बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं.'



आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार

बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. आम्हाला वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच (BJP) होणार, यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू, असंही गोरे म्हणाले.

जयकुमारनं लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं?

पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे? पण त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात आपली लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादीबरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची आपली मानसिकता असायला पाहिजे.’’ एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता असं मला अनेकदा सांगितलं जातं; पण मी का कुणाला भ्याव. चक्क माझा अपघात झाला तो बारामतीने केला, की फलटणने केला याच्या चर्चा सुरू झाल्या, असा मिस्कील टोला देऊन एका जयकुमारने लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं? असेही आमदार गोरे म्‍हणाले.या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरात विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना विचारांची शिदोरी दिली. या शिबिराला जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराची जबाबदारी महाबळेश्वर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या हिमतीने यशस्वीपणे पार पाडली.

फडणवीसांकडे अनोखी ऊर्जा...

फडणवीस यांच्या भेटीत अनोखी ऊर्जा आहे. प्रत्येक संकटाच्या वेळी फडणवीस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक परिस्थितीत मजबुतीने आपल्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आपला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात गेल्यावर सन्मानानं, ताठ मानेने आपला कार्यकर्ता आपले काम करून परत येईल, अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने