आशियाई खो-खो गुवाहाटीत रंगणार

मुंबई : खो-खो या मातीतल्या खेळाची आशियाई स्पर्धा आसाम गुवाहाटी येथील तमूलपूर क्रीडा संकुल येथे २० ते २३ मार्च यादरम्यान आयोजित करण्यात आली आहे, पण सात दिवसांवर येऊन ठेपलेली ही स्पर्धा प्रसिद्धीपासून दूरच असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.१२ देश स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून दूरदर्शन वाहिनीवर या लढतींचा थरार पाहता येणार आहे. आशियाई खो-खो संघटना स्पर्धेला यश मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करीत आहे, अशी माहिती भारतीय खो-खो संघटनेचे सरचिटणीस एम. एस. त्यागी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले, या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेल्या संघातील खेळाडूंची उत्तमप्रकारे सुविधा करण्यात आली आहे. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. काही देशांच्या सहभागाचा तिढा अजून सुटलेला नाही, पण त्यांचा सहभाग निश्‍चित होईल. शिवाय प्रत्यक्ष लढतींसाठी तसेच सरावासाठीही अव्वल दर्जाच्या इनडोअर स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे.



स्पर्धेमध्ये सहभागी होणारे देश

भारत, नेपाळ, भूताण, मलेशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, बांगलादेश, इराण, इराक, पाकिस्तान, इंडोनेशिया, सिंगापूर.

या देशांना अजून प्रतीक्षाच

बारा देशांचा सहभागही निश्‍चित असला तरी इराण, इराक, पाकिस्तान व बांगलादेश हे चार देश अजून प्रतीक्षेत आहेत. राजकीय मंजुरीसाठी या देशांचा सहभाग तळ्यात-मळ्यात आहे; मात्र चारही देशांच्या सहभागाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मत त्यागी यांनी व्यक्त केले.

दूरदर्शनवर लढतीचा आनंद

खो-खो या आपल्या देशातील खेळाची मोठी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतील लढतींचे थेट प्रक्षेपण कोणत्या वाहिनीवर दाखवण्यात येईल, याबाबत त्यागी यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्या देशामध्ये क्रिकेट सुरू असले की इतर खेळांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आम्ही दूरदर्शन या वाहिनीवर या स्पर्धेच्या लढती दाखवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.भारताचा दोन्ही गटांतील (पुरुष व महिला) संभाव्य संघ जाहीर करण्यात आला आहे. सराव शिबिरालाही सुरुवात होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने