इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; आज अटकेची शक्यता, पोलीस लाहोरला रवाना

लाहोर: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान  यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचं  एक पथक आज (बुधवार) लाहोरला रवाना झालंय.अटक वॉरंट घेऊन पोलीस पथक जमान पार्कला जाणार आहेत. दरम्यान, पोलीस पथकाला पीटीआय समर्थकांचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी त्यांनी इस्लामाबाद पोलिसांना  त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.सोमवारी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथील पोलिसांनी माजी पंतप्रधानांविरुद्ध बिजली रोड पोलीस ठाण्यात सरकारी संस्थेविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



इम्रान यांच्यावर जनतेला भडकावल्याचा आरोप

एफआयआरमध्ये फिर्यादीनं म्हटलंय, ‘इस्लामाबाद पोलीस पीटीआयच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी जमान पार्कमध्ये पोहोचले, परंतु ते त्यांच्या अटकेपासून बचावले आणि नंतर एका व्हिडिओ लिंकद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, यामध्ये इम्रान खान यांनी संस्थांविरोधात जनतेला आवाहन केलं आणि चिथावणी दिली.’याचिकाकर्त्यानं म्हटलंय की, इम्रान खान यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप केले आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तोशाखाना प्रकरणी इस्लामाबाद न्यायालयानं इम्रान खानविरोधात अटक वॉरंटही जारी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने