जातीशिवाय खत नाही; सांगलीतल्या प्रकारावर CM शिंदे म्हणाले, "केंद्राला कळवतो..."

मुंबई: सांगलीतल्या शेतकऱ्यांना खतांसाठी जात सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. अजित पवार म्हणाले, "सांगली जिल्ह्यात रासायनिक खत विकत घ्यायची असेल तर जात सांगावी लागते. तशी नोंद केली जात आहे. पण शेतकऱ्यांना जात नसते. शेतकरी हीच जात असते. खत खरेदी करताना ई-पोस मशिनमध्ये जात का नोंदवावी लागते? जात टाकली नाही तर पुढे जाता येत नाही. जातीचं लेबल पुरोगामी महाराष्ट्रात चिकटवू नका."



याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, "खत घेताना जातीचा उल्लेख केला जातो, हा विषय विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. ते पोर्टल केंद्र सरकारचं आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही लक्षात घेत आहोत आणि केंद्राला तसं सांगत आहोत की जात वगळून टाकावी."मुख्यमंत्री शिंदे यांनी काल झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना विरोधकांवर टीकाही केली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण सकारात्मक निर्णय घेतले आहेत. विरोधकांचे भ्रमाचे भोपळे फुटले, त्यामुळे ते चिडले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने