धाडसी करारी राजसाहेब आपले, पाठीशी असताना.. अवधूत गुप्तेचं नवं मनसे गीत ऐकाच..

मुंबई: पक्ष कोणताही असो पण राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे सर्वांसाठी ही पर्वणी असते, आणि श्रोतेजन ते आवर्जून ऐकतातच. महाराष्ट्राला उत्सुकता होती ती त्यांच्या कालच्या भाषणाची. म्हणजेच गुढी पाडव्याच्या सभेची.गेली काही वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडव्याच्या निमित्ताने मोठा मेळावा करत जाहीर सभा घेतात. या सभेत ते काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती.त्यांच्या ठाकरे शैलीने त्यांनी कालचे भाषण गाजवलेही. अगदी शिंदे गट, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे सर्वांवरच त्यांनी सडकून टीका केली. पण या सोहळ्याची शान ठरलं ते मनसेचं नवं गीत.. या गाण्याने कालपासून नुसता धुमाकूळ घातला आहे.



राज ठाकरे यांनी काळ शिवतीर्थावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी मनसेच्या नवीन पक्षगीताचे लोकार्पण करण्यात आले. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तने हे गाणं गायलं आहे. कालपासून हे गाणं चर्चेत असून नुकतंच त्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे.गायक अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर मनसेच्या नवीन पक्षगीताचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आई एकविरेच्या कृपेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या समक्ष काल मनसेचे नवीन पक्षगीत लोकार्पित झाले. ह्याआधी मनसे साठी मी केलेल्या ‘तुमच्या राजाला साथ द्या..‘ ह्या गीताला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले! परंतु, ह्यावेळेस मात्र माझी भूमिका केवळ गायकापुरतीच मर्यादित आहे”, असे अवधूत गुप्त याने म्हंटले आहे.

'धाडसी करारी राजसाहेब आपले, पाठीशी असताना डरायचं नाय.. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले.. आता मागे फिरायचं नाय.. प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…' असे या गाण्याचे बोल आहेत.पाच मिनिटांचे हे गाणे मंदार चोळकर याने लिहिले आहे. तर संगीतकार हितेश मोडक याने या गीताला संगीत दिले आहे. तर अमेय खोपकर यांचा मुलगा ईशान खोपकर याने या गाण्याचे संकलन आणि निर्मिती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने