न्यू यॉर्कमधील सिग्नेचर बँक बुडाली!

वॉशिंग्टन : न्यू यॉर्कमधील सिग्नेचर बँक काल (ता. १२) बंद केल्याचे अमेरिकी नियामकांनी जाहीर केले आहे. कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ दोन दिवसांच्या अंतराने ही दुसरी मोठी बँक बंद झाल्याने साऱ्या जगातील आर्थिक विश्वात खळबळ उडाली आहे.क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूकदारांशी व्यवहार असलेल्या या बँकेला आभासी चलनातील दर खालीवर होण्याचा फटका बसला होता. तसेच सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याच्या हादऱ्यामुळे ही बँक कोलमडल्याचे सांगितले जात आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडल्याने हादरलेल्या ठेवीदारांनी सिग्नेचर बँकेतील पैसे काढून घेण्यास सुरुवात केल्याने नियामकांना हे पाऊल उचलावे लागले.

बँकेच्या ८८ अब्ज डॉलर मूल्याच्या ठेवींपैकी ७९ अब्ज डॉलरच्या ठेवींना विमा संरक्षण नसल्याचेही बँकेने तेथील शेअरबाजारांना कळवले होते. त्यामुळे आता सन २००८ च्या अमेरिकेतील सबप्राईम गैरव्यवहाराची पुनरावृत्ती होते की काय या शंकेने आज जगातील सर्वच शेअरबाजार कोलमडले.भारतातही सेन्सेक्स व निफ्टी सुमारे दीड टक्का घसरले. त्यामुळे अमेरिकी ठेवीदार आणि व्यावसायिक यांच्या ठेवी सुरक्षित आहेत, असे सांगण्याची वेळ या महाबलाढ्य राष्ट्राचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर आली.या बँकेवर आता प्रशासक-अवसायक म्हणून ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ची (एफडीआयसी) ची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एफडीआयसी’तर्फे बँकेच्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदार, ग्राहक व अन्य देणेकऱ्यांची देणी फेडली जातील.



आयटी स्टार्टअपना अर्थसहाय्य करणारी सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याचे शुक्रवारी जाहीर झाले होते. त्यानंतर आता दोनच दिवसांत दुसरी बँक बुडाल्यामुळे अमेरिकी फेडरल बँकेसह अमेरिकी सरकारही खडबडून जागे झाले आहे.ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी ‘एफडीआयसी’ने सिग्नेचर बँकेतील सर्व ठेवींची रक्कम आणि मालमत्ता सिग्नेचर ब्रिज बँकेकडे हस्तांतरित केली असून, आता त्याचे संचालन ‘एफडीआयसी’मार्फत केले जाईल.त्याचप्रमाणे या बँकेच्या लिलावाची प्रक्रिया ही सुरू केली जाईल असेही ‘एफडीआयसी’ने म्हटले आहे. सिग्नेचर ब्रिज बँक ही सनदी राष्ट्रीय बँक असून ती सिग्नेचर बँकेच्या ठेवी व अन्य देणे आपल्याकडे घेईल व काही मालमत्ताही खरेदी करेल.सिग्नेचर बँकेच्या देशात ४० शाखा आहेत. आता या बँकेचे सर्व खातेदार आपोआपच सिग्नेचर ब्रिज बँकेचे खातेदार होतील. त्यांना आपले सर्व व्यवहार जुन्या बँकेप्रमाणेच करता येतील. सिग्नेचर बँकेची मालमत्ता ११० अब्ज अमेरिकी डॉलर एवढी असून त्यांच्या ठेवी ८८ अब्ज अमेरिकी डॉलर एवढ्या आहेत.

कठोर शासन करू

‘‘या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांना शासन केले जाईल तसेच मोठ्या बँकांचे नियमन आणि देखरेखीची प्रक्रिया सक्षम केली जाईल, ज्यायोगे अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही,’’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केली. आहे.पेचप्रसंगातून अर्थव्यवस्थेचे व्यवस्थित पुनरुज्जीवन होण्यासाठी सक्षम बँकिंग व्यवस्था असण्यावर भर राहील असेही त्यांनी सांगितले.आता घसरलेली पत सावरण्यासाठी अमेरिकी आर्थिक प्रशासनाने ही धावाधाव सुरू केली असून अमेरिकेचे अर्थमंत्री आणि राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या संचालकांनी या दोन्ही बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकिंग नियामकांशी चर्चा सुरू केली आहे.अमेरिकी नागरिक आणि अमेरिकी व्यावसायिक यांनी आपल्या बँकेतील ठेवी सुरक्षित आहेत याबाबत निश्चिंत रहावे आणि त्यांना जेव्हा गरज भासेल तेव्हा त्या मिळतील, असे आश्वासन देण्याची पाळीही आता बायडेन यांच्यावर आली आहे

भारतीय बाजारांना फटका

मुंबई : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीपाठोपाठ सिग्नेचर बँक बुडाल्याचा फटका भारतीय शेअर बाजारांनाही बसला. भारतीय शेअर बाजारही आज सुमारे दीड टक्क्याच्या आसपास कोसळल्याने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे मूल्य चार लाख कोटी रुपयांनी कमी झाले.सेन्सेक्स ८९७.२८ अंश, तर निफ्टी २५८.६० अंशांनी कोसळला. सोमवारी अमेरिका व युरोपचे शेअर बाजारही तीन टक्क्यांच्या आसपास पडले होते. आशियाई शेअर बाजारही संमिश्र कौल दाखवत होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी सुरुवात चांगली झाल्यावर तासाभरातच जोरदार विक्रीचा मारा सुरू झाला आणि त्यातून कोणतेही क्षेत्र सुटले नाही.बँकिंग आणि वाहननिर्मिती क्षेत्राला सर्वांत जास्त फटका बसला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५८,२३७.८५ अंशांवर, तर निफ्टी १७.१५४.३० अंशांवर स्थिरावला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने