ओंजळभर फुले द्या, साखरमाळ घेऊन जा!

कोल्हापूर, : ‘ओंजळभर फुले द्या, साखरमाळ घेऊन जा’ ही संकल्पना यंदा निसर्गमित्र संस्थेतर्फे राबवली जाणार आहे. ही संकल्पना अधिक व्यापक करण्यासाठी विविध ठिकाणी प्रात्यक्षिकांनाही प्रारंभ झाला आहे.कसबा बावडा परिसरातील महिलांसाठी पर्यावरणपूरक वनस्पतीजन्य रंगांपासून साखरेची माळ तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. महिलांना या उपक्रमांमधून रोजगार निर्मितीही शक्य असून, सण-उत्सवही पर्यावरणपूरक होतील, असे त्या म्हणाल्या.



राणिता चौगुले यांनी बीट, बेल, बहावा, कढीपत्ता, हळद, पुदिना, शेंद्री, पारिजातक, गोकर्ण या वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांपासून साखरेच्या माळा तयार करून दाखवल्या. गुढीपाडव्यासाठी निसर्गप्रेमींनी वनस्पतीजन्य रंगांपासून साखरेची माळ वापरावी. सणानंतर कडूलिंबाच्या पाल्यापासून धान्य सुरक्षित राहण्यासाठी कडूलिंबाच्या गोळ्या तयार करून त्यांचा वापर करावा. निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करावे.तसेच कडूलिंबाचे रोप गुढीसोबतच दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन अनिल चौगुले यांनी केले. हे रंग अक्षतांचे तांदूळ रंगवण्याकरिता, रांगोळीमध्ये, हळद खेळण्यासाठीही वापरता येतात, असेही ते म्हणाले.मेघा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अस्मिता चौगुले यांनी आभार मानले. पराग केमकर, जयश्री सुर्वे, रूपाली परीट, कस्तुरी जाधव, वैष्णवी गवळी यांनी संयोजन केले. दरम्यान, अधिक माहितीसाठी संस्थेच्या महालक्ष्मीनगर येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने