Chat GPT : सगळं जमलं, पण UPSC Pre पास होणं हे Chat GPT च्या तोंडचाही घास नाही!

मुंबई: ChatGPT या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूलची सध्या जोरदार चर्चा आहे. अनेकांनी हे टूल ट्राय करूनही पाहिलंय. एखादा लेख लिहिणं असेल, इमेल लिहिणं असेल, एवढंच काय चॅट जीपीटीने काही सेकंदात कविताही लिहून टाकलीय. आता या चॅट जीपीटीने चक्क UPSC ची परिक्षा दिली आहे. पण इथं मात्र हे टूलसुद्धा फेल झालं आहे.UPSC ची परीक्षा ही जगातल्या सर्वात कठीण परिक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा पास होण्यासाठी परिक्षार्थी दिवसरात्र एक करून अभ्यास करतात. अगदी कमी लोकांना यामध्ये यश मिळतं. चॅट जीपीटी या यंत्रालासुद्धा ही UPSCची परीक्षा पास होता आलेलं नाही. अॅनलिटीक्स इंडिया मॅगझिनने हा प्रयोग करून पाहिला आहे.



त्यांनी UPSC च्या २०२२ च्या प्रीलिम्स परिक्षेचा A सेटचा पेपर १ चॅट जीपीटीच्या सहाय्याने सोडवला. मात्र त्यामध्ये चॅट जीपीटीला १०० पैकी फक्त ५४ प्रश्नांची उत्तरं देता आली. २०२१ चा ८७.५४ हा कट ऑफ पार करणं चॅट जीपीटीलाही जमलं नाही. या प्रश्नपत्रिकेत भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास, इकोलॉजी, विज्ञान, करंट अफेयर्स, पॉलिटी अशा विविध विषयांचे प्रश्न होते.चॅट जीपीटीचं ज्ञान फक्त सप्टेंबर २०२१ पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे या टूलला त्यानंतरच्या घटनांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता आली नाहीत. तसंच UPSCच्या परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमता वापरून प्रश्न सोडवायचे असतात, त्यामुळे तिथे चॅट जीपीटी कमी पडल्याने ते ही परीक्षा पास होऊ शकलं नाही, असं या मॅगझिनने म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने