घरात आनंदाचं वातावरण असतानाच लालूंना कोर्टाची नोटीस; पुन्हा जावं लागणार तुरुंगात?

बिहार : एकीकडं तेजस्वी यादव 'बाप' झाल्यामुळं लालू कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडं राजद सुप्रिमोला सर्वोच्च न्यायालयाची  नोटीस आल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे.आरजेडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयनं लालू यादव  यांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं लालू यादव यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. या याचिकेला अन्य बाबींशी जोडण्यात आलंय. चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव दोषी ठरले आहेत.

सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव

चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं लालू यादव यांना नोटीस पाठवलीये. आरजेडी सुप्रिमोविरोधात सीबीआयनं आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इथं आरजेडी प्रमुखांचा जामीन रद्द करण्याची मागणी सीबीआयकडून (CBI) करण्यात आलीये. यासंबंधीची नोटीस लालू यादव यांना आज पाठवण्यात आली.



आरजेडी सुप्रिमो पुन्हा तुरुंगात जाणार?

लालू यादव यांची झारखंड उच्च न्यायालयानं जामिनावर सुटका केली आहे. त्याचवेळी हा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यानंतर आता लालू यादव यांच्या समर्थकांना काळजी वाटू लागली आहे. कारण, आरजेडी सुप्रिमो पुन्हा तुरुंगात जाणार की काय याची भीती वाटू लागलीये.

लालूंच्या घरात आनंदाचं वातावरण

विशेष म्हणजे, लालू यादव यांच्या घरात आज आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव याला मुलगी झाली आहे. तेजस्वीची पत्नी राजश्रीनं दिल्लीतच एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर संपूर्ण लालू परिवार या आनंदात बुडाला आहे. तेजस्वी यादवनं आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने