पिंड, कावळा, धाकधूक ...अन् गाय!

कोल्हापूर: एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर रक्षाविसर्जन किंवा त्या व्यक्तीच्या इतर धार्मिक विधीमध्ये कावळ्याने पिंड शिवावा, अशी नातेवाईकांची धारणा असते. कावळ्याने पिंड शिवला तरच त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, असे परंपरेने मानले जाते. जोपर्यंत कावळा येत नाही तोपर्यंत सर्वांचीच धाकधूक वाढलेली असते, मात्र ज्या ठिकाणी कावळाच येत नाही, अशा गावात काय करत असतील?... हा प्रश्‍न मोठा आहे. फार लांब नाही, हातकणंगले, मजले किंवा या परिसरातील अनेक गावांमध्ये गायीलाच नैवेद्य देवून मृताच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना मृत व्यक्तींचे नातेवाईक करताना दिसतात.कोल्हापूर शहरापासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हातकणंगले आणि मजले या गावांत वेगवेगळ्या दिवशी रक्षाविसर्जनासाठी जावे लागले. सर्व विधी पार पडला. सर्व राख दोन ते तीन पोत्यांमध्ये भरली. सर्वांनी आणलेला नैवेद्य ठेवला. त्याची पूजा केली. मी मात्र, स्मशानभूमीजवळ असणाऱ्या झाडांवर कावळा शोधू लागलो; पण कावळाच काय एकही पक्षी तेथे दिसत नव्हता. त्यामुळे जो पर्यंत पिंडाला कावळा शिवणार नाही, तोपर्यंत आपली सुटका नाही. असं म्हणून भर उन्हात तिथेच उभा राहिलो आणि कावळ्याची वाट पाहू लागलो.



स्मशानभूमीतील सर्व विधी पार पाडण्यासाठी प्रत्येक गावात ठराविक लोक काम करत असतात. ते लोक जे सांगतील त्यानुसार सर्व विधी केले जातात. येथेही तसाच घटनाक्रम सुरू होता. मी आणि माझ्यासोबत असणारे काहीजण मात्र राहून-राहून झाडांवर कावळा दिसतो का? हे पाहत होतो. कावळा दिसेना म्हणून आम्ही ‘व्याकुळ’ होत होतो. तर दुसरीकडे डोक्याला लाल रुमाल बांधलेला एक व्यक्ती घाई-गडबडीने देशी गाय घेऊन स्मशानभूमीकडे येत असताना दिसला.तेथील स्थानिकचे लोक येणाऱ्या त्या गायीकडे पाहत होते. कशी-बशी गाय स्माशनभूमीत आली आणि त्या गायीला नैवेद्य दाखवला. ठेवलेल्या नैवेद्यापैकी गाईने भाजी-भाकरी खाल्ली. त्या सरशी सर्वांनी गायीला हात जोडले. पाहुण्यांनीही मयताच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करत अश्रूंनी डबडबलेले डोळे रुमालाने पुसू लागले. दरम्यान, कावळ्याचा नियम येथे लागू होत नाही का? असा सवाल तेथील एका ज्येष्ठ नागरिकाला विचारला. तर ते म्हणाले, ‘‘या भागात आता जरा हिरवळ दिसत आहे. पाणी आल्याने झाडेही आहेत; पण बहुतांशी वेळा कावळा येत नाही. त्यामुळे गायीलाच नैवेद्य दिला जातो. यामध्ये काहीही गैर मानत नाही. गायीने नैवेद्य खाल्ल्यानंतर आमची पूजा पूर्ण होते. यामध्ये कोणाचेही दुमत असत नाही.’’

राख मात्र शेतातच

एखाद्या घरची व्यक्ती मयत झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याची राख नदी, ओढ्यात किंवा विहिरीत टाकली जात नाही. तर ज्याच्या त्याच्या शेतातच टाकली जाते. हे या मजले आणि हातकणंगले परिसरातील गावांचे चांगले आणि कौतुकास्पद काम आहे, असे म्हणावे लागेल.

म्हणून कावळा येत नसावा...

हातकणंगले, मजले याशिवाय इतर गावांमध्ये सध्या शेतीला पाणी पुरवठा होत आहे. यामुळे या ठिकाणची शेती चांगली होत आहे. झाडांचीही संख्या वाढत आहे. पूर्वी पाणी कमी होते. त्यामुळे झाडेही कमी असायची. त्यामुळे कावळ्यांचीच काय, पण इतर पक्षीही कमी होते. हिरवळ वाढेल तशी पक्षांचीही संख्या वाढत आहे. हळूहळू कावळे ही येऊ लागतील, अशी अपेक्षा येथील रोहन घाटगे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने