काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री रेड्डी यांचा पक्षाला राम राम

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण कुमार रेड्डी हे सध्या भाजप हायकमांडच्या संपर्कात आहेत. इतकेच नव्हे तर भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही पार पडल्या असल्याचे बोलले जात आहे. रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षाकडून सर्व काही मिळवले आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवण्याचे काम केलं त्यांना आता भाजपमध्ये जावे. असे मत लोकसभा खासदार मणिकम टागोर यांनी रविवारी व्यक्त केले.गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते नाराज होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे.काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे पत्रात त्यांनी लिहिले होते. त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण मात्र स्पष्ट केलेलं नाही.



अविभाजित आंध्रचे अखेरचे मुख्यमंत्री

अविभाजित आंध्र प्रदेशचे अखेरचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम किरणकुमार रेड्डी यांच्या नावावर आहे. किरण कुमार रेड्डी, जे आंध्र आणि तेलंगणाच्या विभाजनाच्या वेळी अविभाजित राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेड्डी यांनी 10 मार्च 2014 रोजी आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या निषेधार्थ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचा राजीनामा देऊन नव्या पक्षाची स्थापना केली

राज्याच्या विभाजनाच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि 12 मार्च 2014 रोजी जय सामक्य आंध्र पार्टी नावाचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती.तरीही पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तब्बल चार वर्षांनी ते १३ जुलै २०१८ रोजी काँग्रेसमध्ये परतले, पण पक्षात महत्त्वाची भूमिका बजावण्यापासून ते दूर राहिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने