पालकमंत्र्यांचा कार्यभार काढून घ्या

 कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांना अपयश आले आहे. केवळ घोषणाबाजी आणि चर्चेची गुऱ्हाळे यापलीकडे ते काहीही करत नाहीत. त्यामुळे अशा पालकमंत्र्यांकडून कार्यभार काढून घ्यावा. हा निर्णय गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घ्यावा.अगदीच उशीर लागणार असेल तर महाराष्ट्र दिनापर्यंत म्हणजे १ मे दिवशी त्यांचा कार्यभार काढून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शहर हद्दवाढ कृती समितीने केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांनी ‘पालकमंत्री हटाव’ अशा घोषणा देऊन निदर्शने केली.



जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरुवातीला बाबा पार्टे म्हणाले, ‘पालकमंत्र्यांनी हद्दवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो असे सांगितले होते, पण महिना उलटून गेला तरी त्यांनी बैठक घेतलेली नाही. शहरातील कोणत्याच प्रश्नावर त्यांनी ठोस उपायोजना केलेली नाही.त्यामुळे त्यांच्याकडून कार्यभार काढून घ्यावा.’ ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘केसरकर यांची पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यावर आम्ही शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यामध्ये त्यांनी या प्रश्नाचा एका महिन्यात अभ्यास करून बैठक घेऊ असे सांगितले.

मात्र, महिना झाला तरी त्यांनी बैठक घेतली नाही. अखेर काळे झेंडे दाखविणार म्हटल्यावर त्यांनी तोंडदेखली बैठक घेतली. त्यामध्येही त्यांनी ठोस भूमिका मांडली नाही. शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याच मुद्द्यावर त्यांनी ठोस भूमिका घेऊन कोणताही प्रश्न तडीस नेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पदभार काढून घ्यावा.’दिलीप देसाई म्हणाले, ‘शहरातील रस्ते, अंबाबाई मंदिरातील मूर्ती संवर्धन, पंचगंगा नदी प्रदूषण या मुद्द्यांवर त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे त्यांना पालकमंत्री पदावरून दूर करून तेथे कृषी, सहकार, वाणिज्य या विभागाची जाण असणारे पालकमंत्री आणावेत.’यावेळी आर. के. पोवार, महादेव पाटील, अनिल कदम, अशोक भंडारी, सुनीता पाटील, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, हेमलता माने, सुवर्णा मिठारी यांच्यासह हद्दवाढ कृती समितीमधील सदस्य उपस्थित होते.

हद्दवाढीवर शासनाची धूळफेक

‘मुख्यमंत्री शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी २०२१ मध्ये कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मागवला होता. आता ते मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी यात लक्ष घातलेले नाही. आमदार जयश्री जाधव यांनी प्रश्न विचारल्यावर नगरविकास खाते असणारे शिंदे उत्तर देत नाहीत तर उद्योगमंत्री सामंत उत्तर देतात ते देखील अपूर्ण आहे. हद्दवाढीच्या मुद्द्यावर शासन फक्त धूळफेक करत आहेत’, असे ॲड. इंदुलकर म्हणाले.

‘मेन राजाराम’चे काय ?

‘पालकमंत्री केसरकर यांनी आल्या आल्या मेन राजाराम हायकूल बंद करून तेथे भाविकांना सुविधा देण्यासाठी मंडप उभारण्याचे ठरवले. नागरिकांनी त्याला विरोध केल्यावर मग हा उद्योग बारगळला. मात्र, अजूनही मेन राजाराम हायस्कूलच्या प्रॉपर्टी कार्डला शाळेचे नाव लागलेले नाही’, असे दिलीप देसाई म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने