खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार

न्यूयॉर्क:  संयुक्त राष्ट्रांतर्फे सागरी जीवसृष्टीवर आयोजित केलेल्या परिषदेमध्ये खुल्या सागर क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी करार करण्यावर सदस्य देशांनी आज सहमती दर्शविली. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि या परिषदेतील दोन आठवड्यांच्या सविस्तर चर्चेनंतर हे यश मिळाले आहे. या प्रस्तावित कराराद्वारे, २०३० पर्यंत खुल्या सागरातील ३० टक्के जैव वैविध्य संरक्षित करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात एकूण ३८ तास या मुद्द्यावर चर्चा होऊन खुले सागरक्षेत्र करार करण्यास सहमती दर्शविण्यात आली. यापूर्वीही अनेक वर्ष या करारासाठी चर्चा सुरु होती. मात्र, निधी पुरवठा आणि मासेमारीचे हक्क या मुद्द्यांवरून बोलणी फिस्कटत होती. याआधी १९८२ मध्ये सागरी कायद्यांबाबत अखेरचा आंतरराष्ट्रीय करार झाला होता. त्यानुसार खुल्या सागरक्षेत्रातील केवळ १.२ टक्के समुद्र संरक्षित ठेवण्यात आला होता आणि उर्वरित महासागरात सर्वच देशांना मासेमारीचे, वाहतुकीचे आणि संशोधन करण्याचे अधिकार दिले गेले होते. 



त्यावेळी खुले सागरक्षेत्र आणि त्यामधील जैववैविध्य या संदर्भात निश्‍चित व्याख्या नव्हती. त्यामुळे फारसे नियंत्रण नसल्याने आणि पर्यावरण बदलामुळे संरक्षित सागरी क्षेत्राबाहेरील महासागरातील सागरी जीवन धोक्यात आले होते. म्हणूनच या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची पर्यावरणवाद्यांची मागणी होती.नव्या करारामुळे, सागरी जीवनाचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, किनारपट्टीवरील सागरी क्षेत्राच्या संवर्धनासाठीही त्या त्या देशांना मदत केली जाणार आहे. हा करार झाला असला तरी त्याची अंमलबजावणी किती प्रभावाने होते, त्यावर त्याचे यश अवलंबून असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणवाद्यांनी दिली आहे. सध्या जगातील १० टक्के सागरी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचा अहवाल आहे.

करारामुळे काय होणार?

  • सागरी जीवनाच्या संवर्धनावर लक्ष ठेवण्यासाठी संस्थेची स्थापना

  • खुल्या सागरात नवीन संरक्षित क्षेत्रे निर्माण करणार

  • खुल्या सागरातील एकूण ३० टक्के क्षेत्र संरक्षित होणार

  • सागरातील व्यापारी व्यवहारांचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेतला जाणार

  • दीर्घ सागरी अंतरावर स्थलांतर करणाऱ्या डॉल्फिन, व्हेलसारख्या प्राण्यांच्या संरक्षणावर भर देणार

वातावरण आणि महासागर हे दोन जागतिक चिंतेचे विषय आहेत. महासागराला असलेल्या धोक्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले असले तरी पृथ्वीच्या भल्यासाठी सागराचे संरक्षण अत्यावश्‍यक आहे. आता करार झाला आहे. सागराचे संरक्षण करण्याची आपल्या पिढीला मिळालेली ही फार मोठी संधी आहे.

- रेबेका हेल्म, सागरी जीवशास्त्रज्ञ

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने