ट्रीसा गायत्री जोडीची उपांत्य फेरीत धडक

लंडन : नावाजलेल्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद पुलेला या भारताच्या जोडीने ऑल इंग्लंड बॅडमिंटन या प्रतिष्ठेची स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जॉली -गायत्री यांनी महिला दुहेरीत ही कामगिरी केली. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची या जोडीची ही सलग दुसरी खेप होय.ट्रीसा- गायत्री जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ली वेन मेई लिअ शुआन या चीनच्या जोडीवर रोमहर्षक विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. भारतीय जोडीने पहिला गेम २१-१४ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र चीनच्या खेळाडूंनी झोकात पुनरागमन करताना २१-१८ असा दूसरा गेम जिंकला आणि बरोबरी साधली.



अखेरच्या गेममध्ये ट्रीसा-गायत्री जोडीने यश मिळवले. भारतीयांनी या गेममध्ये २१-१२ असे यश संपादन केले. गेल्या वेळी उपांत्य फेरीत बाद ट्रीसा जॉली-गायत्री पुलेला गोपीचंद या भारतीय जोडीने मागील वर्षीही ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. पण सँग शूशिआन झेंग यू या जोडीकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ट्रीसा गायत्री जोडीला उपांत्य फेरीच्या लढतीत १७-२१, १६-२१ असे पराभूत व्हावे लागले होते. यंदा त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत.

दिग्गज पराभूत

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुलेला गोपीचंद यांच्यानंतर भारताच्या एकाही खेळाडूला जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाही एकेरी गटामध्ये निराशाच हाती आली. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, सात्विक रेड्डी-चिराग शेट्टी या सर्व अनुभवी खेळाडूंना उपांत्य फेरीपर्यंतही वाटचाल करता आली नाही. आता फक्त ट्रीसा जॉली-गायत्री पुलेला गोपीचंद या जोडीवरच भारताची मदार असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने