लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या भेटी-गाठी

कोल्हापूर : शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी चेतन नरके आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या भेटी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच वेगळा गट स्थापन केल्याने राज्यात सत्ताबदल झाला. या वेळी ४० आमदारांबरोबर १२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. यामध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार धौर्यशील माने या दोघांचाही समावेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत उमेदवार शोधावे लागणार आहेत.



या पार्श्वभूमीवर शिवगर्जना मेळाव्यासाठी आलेल्या खासदार संजय राऊत यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची बुधवारी (ता.१) सायंकाळी भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे समजते. गुरुवारी (ता. २) सकाळी त्यांनी गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्या घरी जाऊन भेट घेतली.या वेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके उपस्थित होते. नरके यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. खासदार राऊत यांनी चेतन नरके यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते.दरम्यान, आज राऊत यांनी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या आजी-माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला. या वेळी सूरमंजिरी लाटकर, रमेश पुरेकर, सुनील मोदी, माजी महापौर भीमराव पोवार, वंदना बुचडे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

के. पी. पाटील यांनी घेतली राऊतांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी गुरुवारी (ता.२) शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या घरी खासदार राऊत यांची भेट घेतली. के.पी.पाटील यांच्या मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे या भेटीला राजकीय चर्चेला उधाण आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने