७३ वन्य प्रजाती धोक्यात! संवर्धनासाठी भारत सरकार किती पैसे करते खर्च?

मुंबई:  जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी वन्यजीव खूप महत्वाचे आहे कारण मानवाचे जीवन वन्यजीवांवर अवलंबून आहे. आज करोडो लोक संसाधने आणि अनेक आर्थिक संधींसाठी वन्यजीवांची मदत घेतात.यासोबतच आपल्या मानसिक विकासासाठी आणि मानसिक शांतीसाठी निसर्गही खूप महत्त्वाचा आहे. म्हणून, संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवांचे वर्चस्व आणि संरक्षण अधोरेखित करण्यासाठी जागतिक वन्यजीव दिन घोषित केला, जो दरवर्षी ३ मार्च रोजी साजरा केला जातो.

जागतिक वन्यजीव दिन कधी सुरु झाला?

२० डिसेंबर २०१३ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेच्या ६८ व्या अधिवेशनात, दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. खरंतर, ३ मार्च १९७३ रोजी, वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन (CITES) सुरु झाले होते.२०२३ मध्ये CITES आपला ५० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. CITES निसर्ग आणि प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी, व्यापाराद्वारे शाश्वतता वाढवण्यासाठी आणि जगभरातील निसर्ग संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी भागीदारीला प्रोत्साहन देते.



जागतिक वन्यजीव दिन 2023 ची थीम काय आहे?

यावर्षी जागतिक वन्यजीव दिनाची थीम 'वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी' अशी ठरवण्यात आली आहे. निसर्ग संवर्धनासाठी सरकार आणि लोक करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी ही थीम आहे आणि या वेळेस २ विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

१. सागरी जीवन आणि महासागर: आपल्या पृथ्वीचा ७०% भाग फक्त पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे वाढत्या ग्लोबल वाॅर्मिंगमुळे सागरी जीवनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

२. व्यवसाय आणि वित्त: निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला भरपूर निधीची आवश्यकता आहे, जे केवळ सहकार्यानेच केले जाऊ शकते.

सरकारने अर्थसंकल्प २०२३ मध्ये वन्यजीवांसाठी बजेट वाढवले :

अर्थसंकल्प २०२३ सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'अमृत धरोहर' योजनेद्वारे जलीय जैवविविधता आणि स्थानिक समुदायांच्या विकासाबद्दल सांगितले. 'ग्रीन डेव्हलपमेंट' अंतर्गत बजेटच्या ७ प्राधान्यांपैकी हे एक आहे.संसदेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, सीतारामन म्हणाल्या, "माननीय पंतप्रधानांनी पर्यावरण जागरुक जीवनशैली चळवळीला चालना देण्यासाठी 'LiFE' (Lifestyle For Environment) योजनेला मार्गदर्शन दिले आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे बजेट ३०७९.४० कोटी इतके ठेवण्यात आले आहे, जे मागील अर्थसंकल्पापेक्षा २४% अधिक आहे.

भारतात ७३ प्रजाती धोक्यात आहेत:

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) च्या २०११ च्या अहवालाचा हवाला देऊन अलीकडेच, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यसभेत माहिती दिली की भारतात ७३ गंभीरपणे धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत. या ७३ प्रजातींमध्ये ९ सस्तन प्राणी, १८ पक्षी, २६ सरपटणारे प्राणी आणि २० उभयचर प्राणी आहेत.त्याच बरोबर, पर्यावरण मंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले की, सर्वोच्च स्तराचे संरक्षण देण्यासाठी सरकार आता वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची I मध्ये सर्वात गंभीर संकटग्रस्त प्रजातींचा समावेश करण्याचा विचार करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने