स्वीस ओपन सुपर बॅडमिंटन आजपासून! सिंधू, लक्ष्यकडून पुनरागमनाची आशा

मुंबई: स्वीस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून (ता. २१) सुरुवात होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. या स्पर्धेची गतविजेती पी. व्ही. सिंधू व मागील वर्षी छान खेळ करणारा लक्ष्य सेन या दोन्ही खेळाडूंनी दुखापतींवर मात केली खरी, पण बॅडमिंटन कोर्टवर त्यांच्याकडून म्हणावा तसा खेळ होत नाही. याच पार्श्वभूमीवर आता हे दोन खेळाडू स्वीस ओपन या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये झोकात पुनरागमन करतील का, हा यक्षप्रश्न याप्रसंगी उभा ठाकला आहे.

पी. व्ही. सिंधू हिने कोरियाचे प्रशिक्षक पार्क सँग यांच्यासोबतचा करार मोडीत काढला. पण त्यानंतर बॅडमिंटन कोर्टवर तिला अद्याप आपली चमक दाखवता आलेली नाही. दुखापतीमधून बरी होत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये तिला चीनच्या सँग मॅन हिच्याकडून पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. आता हा पराभव मागे सारून तिला उद्यापासून स्वीस ओपनसाठी सज्ज व्हावे लागत आहे. पहिल्याच फेरीत तिच्यासमोर स्वित्झर्लंडच्या जेंजिरा स्टेडलमन हिचे आव्हान असणार आहे.



मलेशिया व इंडिया ओपन दोन्ही स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर लक्ष्य सेनने मागील आठवड्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात छान केली. पण डेन्मार्कच्या अँडर्स अँटोसेन याने त्याच्यावर विजय मिळवला आणि भारतीय खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत सलामीच्या लढतीत त्याला हाँगकाँगच्या ली चिऊक यीऊ याचा सामना करावा लागणार आहे. या लढतीत विजय संपादन केल्यास कदाचित भारताच्याच किदांबी श्रीकांतशी त्याला दोन हात करावे लागू शकतात.

त्रीसा - गायत्रीकडून अपेक्षा

भारताला या स्पर्धेच्या दुहेरी विभागामध्ये त्रीसा जॉली - गायत्री गोपीचंद पुलेला या जोडीकडून आशा असणार आहेत. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये या जोडीला महिला दुहेरीत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. पण त्यांची कामगिरी कौतुकास्पद होती. सात्विक रेड्डी चिराग शेट्टी या जोडीलाही सूर गवसलेला नाही. पण पुरुषांच्या दुहेरीत त्यांनाही आपली चमक दाखवावी लागणार आहे.

प्रणॉयसमोर जागतिक पदक विजेत्याचे आव्हान

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या एच. एस. प्रणॉय याने मागील वर्षी झालेल्या स्वीस ओपन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. पण पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर खडतर आव्हान असणार आहे. २०१८ मधील जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणारा चीनचा शी युकी याच्याशी त्याचा सामना होणार आहे. बघूया प्रणॉय त्याचे आव्हान कसे परतवून लावतो ते..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने