मनिका-अर्चनाचा दुहेरीत रोमहर्षक विजय

पणजी : भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने अर्चना कामत हिच्यासह वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत बुधवारी रोमहर्षक विजय नोंदवला. महिला दुहेरीत ०-२ अशा पिछाडीवरून भारतीयांनी हाँगकाँगच्या जोडीला ३-२ असे पराजित केले.स्पर्धा ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर सुरू आहे. हाँगकाँगच्या ली चिंग वॅन व झू चेंगझू जोडीने पहिले दोन गेम ११-८, ११-९ असे जिंकून उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल राखली होती; मात्र नंतर मनिका व अर्चनाने जबरदस्त मुसंडी मारली. पुढील दोन्ही गेम ११-५, ११-६ असे जिंकून भारतीय जोडीने २-२ अशी बरोबरी साधली.

निर्णायक पाचव्या गेममध्ये १०-१० अशी गुणबरोबरी असताना भारतीय जोडीने जिगरबाज खेळ करत दोन गुणांसह सामना जिंकून स्पर्धेतील उत्कंठावर्धक निकालाची नोंद केली. स्पर्धेत मनिका व अर्चनाला महिला दुहेरीत द्वितीय मानांकन आहे.त्यापूर्वी मिश्र दुहेरीतील आशियाई क्रीडा ब्राँझपदक विजेत्या मनिकाने महिला एकेरीत एकतर्फी विजय नोंदवला होता. तिने इंग्लंडच्या टिन टिन हो हिच्यावर ३-० (११-४, ११-८, ११-५) अशी मात केली. पहिल्याच गेममध्ये सलग नऊ गुण जिंकत मनिकाने इंग्लिश खेळाडूस डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.पुरुष एकेरी पायस जैन पराभूत रिकार्डो वॉल्थर (जर्मनी) ०-३, वेस्ली दोरोझारियो पराभूत वि. इमॅम्युएल लेबेसॉ (फ्रान्स) ०-३. महिला एकेरी श्रीजा अकुला पराभूत वि. हाना गोदा (इजिप्त) १-३, यशस्विनी घोरपडे पराभूत वि. मियू नागासाकी (जपान) ०-३. सुतिर्था मुखर्जी वि. वि. सुहाना सैनी ३-१.



हरमीतला साथियन भारी

पुरुष एकेरीत भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू साथियन ज्ञानशेखरन देशवासीय हरमीत देसाई याला भारी ठरला. पात्रता फेरीत सलग तीन लढतींत निर्णायक गेम जिंकून मुख्य फेरीत दाखल झालेल्या हरमीतला साथियनने ३-१ (११-४, १०-१२, १३-११, ११-९) असे नमवले. दुसरा गेम जिंकल्यानंतर हरमीतने तिसऱ्या गेमममध्ये साथियनला झुंजवले, पण नंतर चौथ्या गेममध्ये साथियनचा अनुभव भारी ठरला.

अन्य भारतीयांचे निकाल

पुरुष दुहेरी अचंता शरथ कमल व साथियन ज्ञानशेखरन पराभूत वि. चो सेऊंगमिन व अॅन जेह्यून (कोरिया) १-३). मानूष शाह व स्नेहित सुरावाजुला पराभूत वि. बास्तियन रँबे व ज्युल्स रोलाँ (फ्रान्स) १-३. महिला दुहेरी अहिका मुखर्जी व सुतिर्था मुखर्जी वि. वि. नतालिया बाजोर (पोलंड) व यूस्रा हेल्मी (इजिप्त) ३-०. दिया चितळे व श्रीजा अकुला पराभूत वि. चेंग चिंग व लि यू झून (तैवान) ०-३. यशस्विनी घोरपडे व सुहाना सैनी पराभूत वि. किम नॅयोंग व जू चेओन्हूल १-३.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने