सिफ्त कौर सामरा हिला ब्राँझपदक

भोपाळ : भारताच्या नेमबाजांनी येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व पाच ब्राँझ अशा एकूण ७ पदकांवर मोहोर उमटवली आणि पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले. सिफ्त कौर सामरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदकाला गवसणी घातली. भारताचे हे या स्पर्धेतील सातवे पदक ठरले.महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये चीनच्या झँग कियॉनग्यूए हिने ५९४ गुणांसह पहिले स्थान पटकावले. भारताच्या सिफ्त हिने ५८८ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकच्या ॲनेटा ब्रॅबकोवा हिने ५८६ गुणांसह सहावे स्थान पटकावले.

झँग - ॲनेटा यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत रंगली. या लढतीत झॅंग हिने १६-८ असा विजय साकारला. झँगने सुवर्णपदकावर निशाणा साधला. ॲनेटाला रौप्यपदक मिळाले. सिफ्तने ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.



चीन १२ पदकांसह पहिल्या स्थानी

चीनच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नेमबाजांनी ८ सुवर्ण, २ रौप्य व २ ब्राँझ अशी एकूण १२ पदके जिंकली. चीनने पदकतालिकेत पहिले स्थान कायम राखले. भारताने दुसरे स्थान पटकावले. जर्मनीने १ सुवर्ण, १ रौप्य व १ ब्राँझ अशी एकूण ३ पदके पटकावत तिसरे स्थान मिळवले.

जागतिक नेमबाजी स्‍पर्धा पदकतालिका

  • चीन - सुवर्ण ८, रौप्य २, ब्राँझ २ - एकूण १२

  • भारत - सुवर्ण १, रौप्य १, ब्राँझ ५ - एकूण ७

  • जर्मनी - सुवर्ण १, रौप्य १, ब्राँझ १ - एकूण ३

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने