कोकणच्या हापूस राजाची आवक झाली कमी; कर्नाटकचा आंबा खातोय भाव

सातारा : कोकणातील हापूस महाग अन् आता तो ही कमी प्रमाणात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा मद्रास- कर्नाटकातील आंब्यावरच अवलंबून राहात अमरसाचा आस्वाद घ्यावा लागणार आहेत. त्याचेही दर यावर्षी शंभर ते दीडशे रुपये प्रतिडझन वाढले आहेत. दरम्यान, वादळी वारे, गारपीट अन् ढगाळ वातावरणामुळे रायवळ आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. आवडीची आंबट कैरी सध्या बाजारात दहा ते वीस रुपयांना एक अशी विक्री होत आहे.



कैरी म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. कैरीचे उत्पादन आधीच कमी असून, जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झाडावरील कच्चे आंबे झडल्याने यावर्षी रायवळची आवक सुरूच नाही. रायवळ आंब्यांच्या झाडांना या वर्षी आधीच उशिरा मोहर आला अन् नंतर वारंवार आलेल्या ढगाळ वातावरणाने बराचसा मोहर गळून गेला. काही वर्षांपूर्वी अक्षयतृतीयेस रायवळ आंब्यांचाच आमरस करत असत.मात्र, दिवसेंदिवस रायवळ आंबे बाजारात येण्यास काहीसा उशीर होत आहे. त्यापूर्वीच कलमी आंबे बाजारात दाखल होत आहेत. यावर्षी कोकणातही हापूसच उत्पादन कमी झाले. त्यामुळे हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्‍यात राहिले नाहीत. सध्या कोकणातील हापूसची आवक संपली आहे. उपलब्ध आंबे प्रतीनुसार सहाशे ते आठशे रुपये डझनाने विक्री होत आहेत.

आता बाजारपेठेत मद्रास, कर्नाटकातील आंबा येऊ लागला आहे. मद्रास हापूसचा दर सध्या ५०० ते ६०० रुपये डझन आहे. कर्नाटकातील आंब्यांचा दर ४०० ते ५५० रुपये डझन आहे. हे दर गेल्या वर्षीपेक्षा सुमारे शंभर ते दीडशे रुपयांनी जास्त आहे.दिवसेंदिवस रायवळ आंब्याच्या उत्पादनात घट होत आहे. देशी हापूस, रत्ना, केशर जातीचा आंबा बाजारपेठेत विक्रीस येत आहे.कोकणातील हापूस यावर्षी बाजारपेठेत कमी प्रमाणात आला. मद्रास, कर्नाटकातील आंब्यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही. तेथेही उत्पादनात विविध कारणांनी घट झाली आहे. पंधरा- वीस वर्षांत अशी परिस्थिती प्रथमच पाहात आहे. रायवळ तर बाजारपेठेत अद्याप आला नाही. आलाच तर त्याचे प्रमाण कमी राहील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने