कोल्हापूरचा कारखाना परजिल्ह्यातील कारभाऱ्यांकडे जायला नको यासाठी ही लढाई !

कोल्हापूर : सभासद हा कारखान्याचा आत्मा आहे. मात्र, गेल्या २८ वर्षांतील राजाराम कारखान्यातील कारभार पाहिल्यानंतर कारखाना आणि सभासद यांच्यातील नाते तुटले आहे. त्यामुळे सभासदांशी हे नाते पुन्हा दृढ करण्यासाठी तसेच कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी ‘अंगठी’ला साथ द्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.छत्रपती राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्या वतीने पट्टणकडोली येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.आमदार पाटील म्हणाले, ‘‘कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांचे अर्थकारण राजाराम कारखान्यावर अवलंबून आहे. उसाचा दर, ऊसतोड हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.



पण, सत्तारूढ गटाच्या कारभारामुळे सभासद कारखान्याकडे यायचे टाळत आहेत. कारखान्याची सद्यस्थिती पाहून हे सभासद व्यथित झाले आहेत. त्यामुळे सभासदांसाठी जिव्हाळ्याचा असणारा राजाराम कारखान्याचा लौकिक वाढविण्यासाठी परिवर्तन घडवले पाहिजे. राजाराम कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. कोल्हापूरचा हा कारखाना परजिल्ह्यातील कारभाऱ्यांकडे जायला नको, यासाठी ही लढाई आहे.’’ज्येष्ठ सभासद महादेव मोटे म्हणाले, ‘‘राजाराम कारखान्यात लोकशाही टिकवण्यासाठी परिवर्तन आघाडीला साथ द्यावी.’’ गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, उपसरपंच उमेश गुरव, अमोल बानदार, शरद पुजारी, सुधाकर पोवार, शिरीष देसाई, रमेश देसाई, धुळा पुजारी, बाळू बचचाई, विजय पिराई, सचिन पाटील, बबन रानगे, राजू यादव, प्रकाश जेरे, नाना मोटे, विनायक फाळके उपस्थित होते.दरम्यान, शिरोली पुलाची येथील सभेत आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘भीमा कारखान्यावर ५८७ कोटी रुपयांचे कर्ज करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या संसदरत्न खासदारांनी आम्हाला सहकार कसा चालवायचा हे शिकवू नये.

तज्ज्ञ संचालक म्हणून कारखान्यात आले आणि ते कारखान्याचे मालक होऊ पाहत आहेत. गेल्या २८ वर्षांत कारखान्याचे काम पाहताना सभासदांचा किती उत्कर्ष झाला आणि कारखान्याच्या आडून त्यांचा किती उत्कर्ष झाला याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.आम्ही सभासदांच्या हिताचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहे तर सत्ताधारी मुद्द्याऐवजी निवडणूक वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी हा लढा आहे’ आमदार राजू आवळे, माजी सरपंच शशिकांत खवरे, महेश चव्हाण, उत्तम सावंत, उमेदवार बी. टी. देशमुख, संभापूरचे माजी सरपंच प्रकाश झिरंगे, बी. एच. पाटील आदींची भाषणे झाली.

अध्यक्षांच्या ट्रॅक्टरला १७२ दर रुपये का?

कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, ‘महाडिकांनी २८ वर्षे राजाराम कारखान्यात स्‍वार्थ पाहिला आहे.’ वाहतुकीचा इतर ट्रॅक्टर धारकांना दर १३२ रुपये तर अध्यक्ष दिलीप पाटलांच्या ट्रॅक्टरला दर १७२ रुपये का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने