कमी जागा काँग्रेसला अमान्य! नितीशकुमारांबाबत सावध भूमिका; किमान ३७० जागांचा श्रेष्ठींचा आग्रह

दिल्ली:  विरोधी ऐक्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. नितीशकुमार यांच्याकडे अधिकृत जबाबदारी नाही ते त्यांच्यापरीने बोलत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांशी बोलत आहेत, असे कॉंग्रेस सूत्रांकडून सांगण्यात आले.भाजपविरुद्ध एकास एक उमेदवार देण्यासाठी विरोधी ऐक्याच्या नावाखाली कॉंग्रेसने २२० पर्यंत जागा लढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, तो पक्षाकडूनच नाकारण्यात आल्याचे कळते किमान ३७० जागांवर कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढेल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.



सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरुद्ध कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षांची व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना सुरवात झाली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अलीकडेच दिल्लीत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींची भेट घेतली होती. विरोधकांच्या प्रस्तावित आघाडीसाठी ते समन्वयक म्हणून काम करतील असे सांगण्यात आले होते. प्रामुख्याने, कॉंग्रेसशी जवळीक नसलेल्या पक्षांशी ते संपर्क साधतील, असा कयास वर्तविला जात आहे. कॉंग्रेसकडून मात्र, यावर औपचारिक भाष्य करण्यात आलेले नाही. दुसरीकडे, अशा प्रयत्नांसाठी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेली अनौपचारिक समिती नेमली जाऊ शकते, त्यात शरद पवार, दिग्विजयसिंह, सीताराम येचुरी, रामगोपाल यादव यासारख्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश असेल, अशीही चर्चा आहे.

संयुक्त उमेदवाराच्या प्रस्तावाची चर्चा

विरोधकांच्या एकजुटीबरोबरच लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात प्रत्येक मतदारसंघात संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्याचा प्रस्तावही प्रामुख्याने चर्चेत आहे. त्यात कॉंग्रेसने आपले प्रभाव क्षेत्र असलेल्या राज्यांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी ताकद असलेल्या प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देणे अपेक्षित आहे. यासाठी कॉंग्रेसने २२० ते २३० जागांवर लढावे, असा विरोधकांचा आग्रह आहे. सर्वप्रथम रणनितीकार प्रशांतकिशोर यांच्याकडून ही सूचना समोर आली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी ती उचलून धरली असून कॉंग्रेसमधून शशी थरूर, मनीष तिवारी यासारख्या नेत्यांनी अशा प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.परंतु, असे करताना कॉंग्रेसला किमान दीडशे जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याने कॉंग्रेसने ३७० पेक्षा कमी जागा लढविण्यास नकार दिल्याचे समजते.

पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ नको

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधील वाद आणि लोकसभा निवडणूक यासंदर्भात शरद पवार यांच्या ताज्या विधानावर राजकीय अटकळबाजी सुरू असली तरी कॉंग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही अशी सावध भूमिका घेतली आहे. शरद पवार यांच्याबद्दल अंदाज बांधता येणार नाही. परंतु महाविकास आघाडीचे जनक तेच होते. शिवसेनेसोबत जाण्यास कॉंग्रेसमधूनच प्रचंड विरोध होता. तरी देखील पवार यांनी ही आघाडी तयार केली होती त्यामुळे आताचे त्यांचे वक्तव्य यावर फारसे वेगळेपणाने पाहण्याची गरज नाही, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सूत्रांनी महाराष्ट्रातील घडामोडींवर टिप्पणी केली.

जानेवारीनंतर खरी चर्चा

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी कॉंग्रेसने सर्वाधिक म्हणजे ४५० जागा लढविल्या आहेत. त्याखालोखाल सर्वात कमी म्हणजे ३९० जागा लढविल्या आहेत. म्हणजेच हे सर्व कॉंग्रेसचे मतदारसंघ आहेत. या दोन्ही आकड्यांचा मध्य म्हणून कॉंग्रेस ३७० पेक्षा कमी जागा कमी जागा लढविणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणूक सुरू असलेले कर्नाटक त्याचप्रमाणे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड यासारख्या ठिकाणी अन्य पक्षांचे अस्तित्व कुठे आहे? सवाल करण्यात आला. सध्या जागा वाटप हा मुद्दा हवेत असून डिसेंबर जानेवारीनंतर त्यावर खऱ्या अर्थाने चर्चा होईल असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने