विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ने शाळा बेजार; संकेतस्थळ चालेना, दिवसरात्र नोंदीची लगबग

सातारा:  राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर ३० एप्रिलअखेर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणीकरण संच मान्यतेसाठी बंधनकारक केले आहे. मात्र, विविध तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ सुरू होत नाही. सुरू झाले तर विद्यार्थ्यांचा आधार कार्डातील तपशील जुळत नाही, असे अडथळे येत आहेत.विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना मान्यता (संच मान्यता) देण्यात येते. बनावट बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक पदे भरण्यात आल्याचे काही वर्षापूर्वी उघडकीस आले. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदविण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अजूनही काढलेली नाहीत. 



अनेकांनी ती अद्ययावत केलेली नाहीत. शाळेतील नोंदणीशी विद्यार्थ्यांच्या आधारवरील माहिती जुळत नाही. रोजगाराच्या निमित्ताने सतत स्थलांतरित होणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांकडून वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.सर्व्हरला वारंवार अडथळे येत आहेत. एक-एक आठवडाभर संकेतस्थळ देखभालीसाठी बंद केली जात आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पुरेसे इंटरनेट नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन कामांना पुरेशी गती येत नाही. अशा अनेक तांत्रिक अडचणींवर मात करीत शाळा प्रशासन रात्रंदिवस ऑनलाइन काम करीत आहे, तरीही आधार नोंदणी व प्रमाणिकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.अनेकदा पोर्टलवर यशस्वीरीत्या भरलेला डेटा पुन्हा अप्रमाणित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जण वैतागले आहेत. त्यातच शिक्षण विभाग व संस्थाचालक आधार डेटा बेस कामाचा वारंवार आढावा घेत आहेत.

राज्याची स्थिती (१० एप्रिलपर्यंत)

२,०९,६१,४९० - आधार नोंदणी असलेले विद्यार्थी

१,८०,५३,५८० - यूआयडीएआयसह प्रक्रिया केलेले विद्यार्थी

१,४२,५४,५८३ - यूआयडीएआयसह आधार वैध असलेले विद्यार्थी

४,१०,०२९ - आधार नसलेले विद्यार्थी

२९,०७,९१० - यूआयडीएआयसह प्रक्रिया न केलेले विद्यार्थी

३७,९८,९९७ - यूआयडीएआयसह आधार वैध नसलेले विद्यार्थी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने