न घेतलेल्या कर्जाचे हफ्ते अचानक खात्यातून जाऊ लागले; 'हा' प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो

पुणे  : न काढलेल्या कर्जाचे हफ्ते आपल्या बँक खात्यातून जात असल्याचे पाहून त्यांनी बँक गाठली. बँकेने हात वर करत संबंधित व्यावसायिकाकडे चौकशी करायला पाठवले. त्यानेही आपला याच्याशी संबंध नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी न्यायासाठी पोलिस चौकी गाठली.अशा पद्धतीने फसणारे आपण एकटे नसून, आपल्यासारखे अनेकजण आहेत हे ऐकून तक्रारदारांना धक्काच बसला. चांगल्या दुकानातून वस्तू घेतली. तेथे अशी फसवणूक होत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवावा असा प्रश्न फसवणूक झालेल्यांना पडला आहे.



कोथरूडमधील केळेवाडी येथे राहणाऱ्या शंकर सखाराम तोंडे व दीपाली रामदास येवले यांनी पोलिसांत आपल्या नावाने दुसऱ्यानेच कर्ज घेतले असून, आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. तोंडे म्हणाले, की मी मुलीसाठी वीस हजार रुपयांचा मोबाईल हफ्ता पद्धतीने खरेदी केला होता.विक्री व्यवस्थापक व बँक प्रतिनिधी यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे देऊन कर्ज मंजूर करून घेतले. डिसेंबर २०२२ ला पगार झाल्यावर खात्यातून १०,२३७ रुपये वजा झाल्याचे दिसले म्हणून चौकशी केली तेव्हा आयडीएफसी बँकेत आपल्या नावावरून ८४,८९९ रुपयाचे कर्ज घेतल्याचे आढळले.

बँकेत विचारणा केली असता, तुम्ही ज्या दुकानात कागदपत्रे दिली होती, तेथे चौकशी करा असे सांगण्यात आले. तेथे चौकशी केली असता विक्री व्यवस्थापकाने प्रतीक्षा चौरे यांना फोन करण्यास सांगितले. मी चौरे यांना फोन केल्यावर त्यांनी सांगितले की, या गोष्टीचा गाजावाजा करू नका. मी तुमच्या बँकेत सर्व पैसे जमा करते.माझ्याकडून हे चुकून झालेले आहे. त्यावेळी माझ्या खात्यात वजा झालेले पैसे परत जमा झाले. परंतु आता परत माझ्या खात्यातून पैसे जाऊ लागले आहेत. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.यासंदर्भात तक्रार आली असून, आमचा तपास सुरू असल्याचे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने