आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघालची सुवर्णपदकाकडे वाटचाल

कझाकस्तान: भारताची २० वर्षांखालील विश्वविजेती अंतिम पंघाल हिने कझाकस्तानची राजधानी असणाऱ्या अस्थाना येथे सध्या सुरू असणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे; तर भारताच्या चार खेळाडू ब्रॉंझपदकाची आपली दावेदारी पेश करणार आहेत.अंतिम पंघाल हिने उझबेकिस्तानच्या अकटेंगे क्यूनिमजेवा हिचा ८-१ असा एकतर्फी पराभव करत आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अंतिम हिने या लढतीत खरेतर एकही गुण गमावला नाही. उपांत्य फेरीची कुस्ती चालू असताना अंतिमला पंचांनी ताकीद दिली, त्यामुळे तिला एक गुण गमवावा लागला. नाहीतर या संपूर्ण लढतीमध्ये अंतिम हिने अकटेंगे क्यूनिमजेवावर कुस्तीच्या पहिल्या क्षणापासूनच वर्चस्व राखले होते.



अंतिम हिने लढतीमध्ये सुरुवातीलाच आक्रमण करताना डाव्या पायाने चाल रचत पहिला गुण जिंकला. पहिला गुण गमावल्यानंतर उझबेकिस्तानच्या कुस्ती खेळाडूने प्रतिआक्रमण रचत अंतिमला बांधून ठेवले. मात्र चपळाईने अंतिम हिने अकटेंगे क्यूनिमजेवाची पकड ढिली करत आपली सहज सुटका करून घेतली. जेव्हा जेव्हा अंतिम क्यूनिमजेवाच्या पकडीमधून आपली सुटका करून घेत होती, तेव्हा तेव्हा लगेच सुटका झाल्यावर तिने आक्रमण करत सलग गुण जिंकले.दरम्यान, याआधी अंतिम हिने या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सिंगापूरच्या हसियो पिंग अलविना लिमचा चितपट करत पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या लि डेंग हिच्यावर ६-० असा सहज विजय मिळवला होता. अंतिम हिचा सुवर्णपदकासाठी सामना २०२१ मधील जागतिक विजेत्या जपानच्या अकारी फुजीनामीशी होणार आहे.

चार खेळाडू ब्राँझपदकासाठी लढणार

भारताची अजून एक प्रतिभावान महिला कुस्ती खेळाडू अंशू मलिकला मात्र जपानच्या साई नांजोकडून उपांत्यफेरीच्या सामन्यात ५-१ असे पराभूत व्हावे लागले. कुस्ती लढतीच्या पहिल्या भागात साई नांजोकडून आक्रमक पवित्रा अवलंबला गेला. दुसऱ्या भागातही साईकडून अंशूची पकड करण्यात आली. साईकडून पकडीसाठी केलेल्या आक्रमणामुळे अंशूला दुखापत झाल्याने ही लढत थांबवण्यात आली आणि साईला ५-१ असे विजयी घोषित करण्यात आले. अंशू दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यास तिचा ब्रॉंझपदकासाठी सामना मंगोलियाच्या अर्डनसुवेद बॅट अर्डनशी होणार आहे; तर मनीषा, रितिका आणि सोनम मलिकसुद्धा ब्रॉंझपदकासाठी आपले नशीब आजमावणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने