गुआमला लक्ष्य करण्याचा उत्तर कोरियाचा इशारा,अमेरिकेची तयारी सुरू !

उत्तर कोरिया: काही वर्षांपूर्वी अमेरिकेचा लष्करी तळ गुआम याला लक्ष्य करण्याचा इशारा उत्तर कोरियाचे अध्य़क्ष किम जोंग उन यांनी दिला होता. एवढेच नव्हे, तर अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी लॉस एन्जेल्स, सॅन फ्रान्सिस्को या शहरांवर अण्वस्त्र टाकण्याचीही भाषा त्याने केली होती. दुसरीकडे तैवानला गिळंकृत करण्याची तयारी चीन करीत असून येत्या तीन ते चार वर्षात त्या दिशेने चीनची आक्रमक पावले पडतील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीकडे पाहता, चीन व अमेरिका यांच्यातील संघर्षाचा भडका गुआममध्ये उडण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रसिद्ध नियतकालिक `द इकॉनॉमिस्ट’ ने नुकताच व्यक्त केला आहे. पश्चिम प्रशांत महासागरातील मायक्रोनेशिया परिसरातील गुआम 1898 पासून अमेरिकेच्या ताब्यात असून, सॅनफ्रान्सिस्कोपासून त्याचे अंतर 9300 कि.मी. तर द फिलिपीन्सची राजधानी मनिलापासून 2600 कि.मी अंतरावर आहे. लोकसंख्या केवळ पावणे दोन लाखांच्या आसपास आहे.



हवाईपासून त्याचे अंतर सात हजार कि.मी. आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अमेरिकन राज्यकर्त्यांना असे वाटत  होते, की हवाईवर प्रभुत्व असले, की अमेरिकेवर कोणताही देश आक्रमण करण्यास धजावणार नाही. परंतु, तो अंदाज सपशेल चुकला आणि 7 डिसेंबर 1941 रोजी जपानी वायुदलाने पर्ल हार्बरवर जोरदार हल्ला करून अमेरिकेला नामोहरम केले होते.या हल्ल्याने अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली व प्रत्युत्तर म्हणून जपानला धडा शिकविण्याच्या उद्देशाने अमेरिकेने हिरोशीमा व नागासाकीवर अण्वस्त्र हल्ले केले. अलीकडे युक्रेनवर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची धमकी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. त्याकडे पाहता, पुतिन यांच्या सारखा आक्रमक नेता अमेरिका व नाटोला धडा शिकविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे निदान काढल्यास ते अगदीच चुकीचे ठरेल, असे म्हणता येणार नाही.  गुआम प्रसिद्ध आहे, ते पर्यटनासाठी. दरवर्षी या बेट वजा अमेरिकन लष्करी तळाला 17 ते 18 लाख पर्यटक भेट देतात. तेथील `तुमन बे’ त्यासाठी प्रसिद्ध आहे. गुआम बेटावर अमेरिकेचा नौदल व त्याच बेटावरील अँडरसन येथे हवाई दलाचा तळ आहे. तेथे लढाऊ एफ 15 व बी-1 या विमानांचा सराव चालू असतो. हवाईची राजधानी होनोलुलु येथे रोज सकाळी अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ  एफ 22 रॅप्टर या विमानाचे सराव मी पाहातो आहे. तैवानमधील तणाव जसा वाढतोय, तसा गुआमच्या दिशेने चीन सक्रीय होणार असा अंदाज आहे. त्यावर चीन क्षेपणास्रांचा हल्ला करू शकतो.

हवाईच्या मानाने गुआमची शस्त्र शज्जता कमी असल्याने गुआमला शस्त्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुआम येथील थाड क्षेपणास्त्राच्या बॅटऱ्या नेहमीच चालू अवस्थेत असतात, असे नाही. उत्तर कोरियाच्या अचानक हल्ल्याला उत्तर देऊ शकेल, अशी शस्त्रास्त्रे तिथं असली, तरी चीनच्या अत्याधुनिक व वेगवान क्षेपणास्त्रांपुढे तेथील शस्त्रास्त्रं पुरेशी पडतील, असे नाही.शिवाय, अमेरिकेची विमान विरोधी `पॅट्रिऑट’ क्षेपणास्त्रप्रणालीही तेथे तैनात नाही. चीनचे 4 हजार कि.मी. पल्ल्याच्या डीएफ 26 या क्षेपणास्त्राला `गुआम किलर’ असे म्हटले जाते. 2020 मध्ये चीनने प्रचारासाठी तयार केलेल्या एका व्हिडिओमध्ये चीनी एच 6 के बॉंबर विमान हल्ला करताना दाखविण्यात आले होते.

उपग्रहांच्या साह्याने केलेल्या पाहाणीतून दिसून आले. चीनच्या संभाव्य हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने अमरिकेने अलीकडे जपान व ऑस्ट्रेलियाबरोबर काही लष्करी सराव केले. हवाई येथील `इन्डो पॅसिफिक कमांडनेही (इंडोपॅकॉम)’ वॉशिंग्टनचे लक्ष वेधले असून, गुआमचे बळकटीकरण करण्यासाठी 1.5 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे.या व्यतिरिक्त इंडोपॅकॉमने 147 दशलक्ष डॉलर्सची गरज असल्याचे कळविले आहे. 2024 पर्यंत गुआमला संरक्षणरित्या सज्ज करण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. परंतु, प्रश्न आहे, तो या सशस्त्रीकरणाने युद्धजन्य स्थितीकडे गुआमची वाटचाल होते आहे, असे वाटल्यास त्याचा पर्यटनांवर काय परिणाम होईल. त्याचाही विचार अमेरिकन राज्यकर्त्याना करावा लागेल.

हिंद प्रशान्त महासागरात चीनची अरेरावी चालू नये म्हणून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया व भारत यांचे मलाबार नौदल सराव गेली अऩेक वर्ष सातत्याने चालू आहेत. दुसरीकडे, ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया `औकुस’ या संरक्षणात्मक व्यवस्थेखाली एकत्र आले आहेत. हे सारे प्रयत्न असूनही चीनच्या विस्तारवादी धोरणाला वेसण लागणार काय, असा प्रश्न कायम आहे.या प्रयत्नांना आणखी बळ द्यावयाचे असेल, तर दक्षिण व अतिदक्षिण पूर्वेकडील लोकशाही राष्ट्रांना एका व्यासपीठावर यावे लागेल, असाही युक्तिवाद केला जातो. प्रत्यक्षात त्या दिशेने अजून पाऊल पडलेले नाही, की त्यासाठी कुणी पुढाकार घेतलेला नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने