Adani Group बाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही'

सातारा : अदानी उद्योगसमूहाच्‍या अनुषंगानं आलेल्‍या हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने समिती नेमण्‍यास मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार ती नेमल्‍यानंतर वस्‍तुस्‍थिती समोर येईल. तोपर्यंत उगीचच कोणालाही आरोपीच्‍या पिंजऱ्यात उभं करणं बरोबर नसल्‍याचं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा इथं माध्यमांशी बोलताना नोंदवलं.जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मविआचे समर्थक, पाठीराखे म्‍हणून एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्‍याचा विश्‍‍वासही त्‍यांनी यावेळी केला. सातारा इथं विविध कार्यक्रमांसाठी अजित पवार आले होते.



या वेळी त्‍यांना अदानी समूहाच्‍या अनुषंगानं माजी खासदार राहुल गांधी  यांच्‍यासह इतर विरोधी पक्षांनी संयुक्‍त संसदीय समितीच्‍या स्थापनेची मागणी केली असून, त्‍या भूमिकेला छेद देणारे मत खासदार शरद पवार यांनी मांडल्‍याने महाविकास आघाडीत फूट पडू शकते या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर अजित पवार यांनी वरील मत नोंदवलं.पवार म्‍हणाले, प्रत्‍येकाची श्रद्धास्थानं असतात. त्‍यानुसार ते त्‍या त्‍या ठिकाणी जात असतात. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्‍येला गेले आहेत. आम्‍ही त्‍यांना दौऱ्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. आम्‍ही सुद्धा अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी जातो. आमच्‍यातले अनेक तिरुपतीला जातात आणि त्‍याठिकाणाहून आणलेला प्रसाद दिल्‍यावरच ते आम्‍हाला सांगतात तिकडं गेलो होतो, असंही त्यांनी मिश्किलपणे सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने