भाजपला मोठा धक्का; तिकीट न दिल्यामुळं माजी उपमुख्यमंत्र्यानं दिला पक्षाचा राजीनामा

कर्नाटक: कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. तिकीट न दिल्यामुळं नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी  यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय.कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लक्ष्मण सवदी म्हणाले, 'मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा मी नाही. मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे.'



प्रदीर्घ विचारमंथनानंतर भाजपनं मंगळवारी रात्री कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या पारंपारिक शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, त्यांच्या सरकारमधील मंत्री आर अशोक कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि दुसरे मंत्री व्ही सोमन्ना वरुणा विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुध्द निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने 52 नवे चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. 189 उमेदवारांच्या यादीत 32 इतर मागासवर्गीय आहेत, तर 30 अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीचे आहेत. उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण आठ महिलांना स्थान मिळालं आहे. कर्नाटकात पूर्ण बहुमतासह सत्तेत परतण्याचं लक्ष्य असलेल्या भाजपनं विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी किमान 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने