जेपीसीवरुन पवारांची काँग्रेसविरोधी भूमिका; पटोलेंनी दिला कोळसा घोटाळ्याचा संदर्भ!

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणात काँग्रेसविरोधी भूमिका मांडली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जीपीसीच्या मागणीबाबत पवारांच्या विधानावर त्यांनी यूपीए सरकारच्या काळातील कथीत कोळसा घोटाळ्याचा संदर्भ दिला.पटोले म्हणाले, "हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कोळसा घोटाळ्याचा आरोप झाला होता, तेव्हा कोर्टाची समिती बसवण्यात आली होती. पण तेव्हा देखील विरोधकांच्या सांगण्यावरुन जेपीसीमार्फत चौकशी करण्यात आली होती" यावरुन हिडेनबर्गच्या रिपोर्टमुळं अदानींविरोधातील आरोपांची दोन्ही प्रकारे चौकशी होऊ शकते, असंच पटोलेंना सुचवायचं असेल.



दरम्यान, शरद पवारांचं हे वैयक्तिक मत असलं तरी PM मोदी अदानीच्या प्रकरणात घाबरत का आहेत? असा सवाल आता देशाची जनता विचारत आहे. कारण यामध्ये एलआयसीचा, एसबीआयचा किंवा पीएफचा पैसा असण्याची शक्यता असल्यानं जनतेच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण त्यांचा पैसा लुटला जात आहे. देशाची जनता पंतप्रधानांना प्रश्न विचारत आहे पण पंतप्रधान या विषयावर बोलायला तयार नाहीत, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.त्यामुळं शरद पवारांचं हे व्यक्तीगत मत असेल पण जेपीसीमार्फत या प्रकरणात चौकशी व्हायला पाहिजे. जेपीसीशिवाय यामधील सत्य बाहेर येणार नाही. यामध्ये सर्वपक्षीयांचा समावेश असतो, यामध्ये सत्ताधारींची संख्या जास्त असेल पण वास्तविकता जनतेसमोर येईल ते येऊ द्या ना. जर मोदींनी काहीही केलेलं नाही तर त्यांना भीती कसली वाटतेय? असा सवालही त्यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने