विद्युत वाहने बनवणारा अवलिया! केली तब्बल २५ वाहनांची निर्मिती

कोल्हापूर:  विविध ऑटोमोबाईल कंपन्यांच्या विद्युत वाहनांचा सर्वत्र बोलबाला आहे. विविध प्रकारच्या ‘ई-बाईक’ शहरात दिसतात. बोंद्रेनगर येथे वाहन दुरुस्त करणारे अमित चव्हाण यांनी स्वतः तब्बल २५ विद्युत वाहने बनवली आहेत. यामध्ये रिक्षा, मालवाहू टेम्पो तसेच सायकलचाही समावेश आहे. त्यांनी बनवलेली ही वाहने ग्राहकांना कमी बजेटमध्ये चांगली सेवा देत आहेत.कलानगरी, क्रीडानगरी या बरोबरच कुशल कारागिरांची नगरी ही कोल्हापूरचे आणखी एक वैशिष्ट्य. शेतीची विविध अवजारे, नदीतील पाणी ओढणारी इंधनावरील मोटर इथपासून ते फिरता रंगमंच बनवण्यापर्यंत इथल्या कुशल कारागिरांनी अनेक अभिनव गोष्टी बनवल्या. कोल्हापुरातील फौंड्री उद्योगही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला आहे. त्यातच आता विद्युत वाहनांची भर पडली आहे. चव्हाण यांनी तीन आसनी रिक्षा, मालवाहतूक करणारे छोटे टेम्पोही बनवले आहेत.



विशेष म्हणजे ही केवळ प्रायोगिक तत्त्‍वावरील वाहने नाहीत तर प्रत्यक्ष नोंदणी करून ती रस्त्यावर फिरत आहेत. ग्राहकांना सेवा देत आहेत. अमित यांचा वाहन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. वाहने दुरुस्त करताना त्यांनी त्यामधील तंत्रज्ञानही आत्मसात केले. वाहनातील कोणता भाग काय काम करतो. त्यासाठी उर्जा कोठून घेतो याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यानंतर आपल्या कल्पकतेने त्यांनी विजेवर चालणारी वाहन बनवण्यासाठी प्रयत्न केले. प्रयोगान्ती त्यांनी विद्युत वाहन यशस्वीपणे बनवले. पाच वर्षांपासून त्यांनी अशा प्रकारची वाहने बनवायला सुरुवात केली. लोकांनीही त्यांच्याकडून रिक्षा, मालवाहतूक करणारे छोटे टॅम्पो बनवून घेतले. त्यांनी बनवलेली वाहने ग्राहकांना सेवा देत आहेत.

विद्युत रिक्षाचे वैशिष्ट्य

  • संपूर्ण विजेवर चालणारे वाहन

  • ५०० ते ६०० किलो वहनाची क्षमता

  • एकवेळा चार्जिंग करण्यासाठी अडीच युनीट वीज

  • पूर्ण चार्ज झाल्यावर ९० कि.मी. रिक्षा धावते.

  • हातामध्ये ब्रेकची सुविधा

विद्युत वाहनांमुळे हवेचे प्रदूषण कमी होते. इंधनावरील भार हलका होऊन इंधनाची बचत होते. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन मी विद्युत वाहने बनवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत २५ वाहने बनवली आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देता आली याचे समाधान आहे.

- अमित चव्हाण, विद्युत वाहने निर्माता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने