नवा भारत प्रत्युत्तर देण्यास समर्थ ; एस. जयशंकर

काम्पाला : अनेक दशकांपासून भारतात सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांना आता, ‘हा नवा भारत असून तो आपल्याला प्रत्युत्तर देण्यास समर्थ’ असल्याचे समजून चुकले आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले. पाकिस्तान आणि चीनमुळे देशाच्या सुरक्षसमोर आव्हान निर्माण झाल्यास त्याचा आम्ही सामना करू शकतो, असेही जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

जयशंकर हे युगांडा दौऱ्यावर असून आज त्यांनी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतात अनेक बदल घडून आले असून सध्याचा भारत हा ‘नवा भारत’ असल्याचे जयशंकर म्हणाले. सीमेवर निर्माण होणाऱ्या आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले,‘‘स्वत:च्या पायावर ठामपणे उभा असलेला भारत सध्या सर्वांना दिसतो आहे.राष्ट्रीय सुरक्षेसमोर निर्माण झालेल्या कोणत्याही आव्हानाचा, मग ते उरी असो की बालाकोट, सामना करण्यास भारत आता समर्थ आहे. काही शक्तींनी भारताच्या सीमेवर अनेक दशके घुसखोरी केली आणि भारताने ती सहनही केली; मात्र त्यांना आता तातडीने प्रत्युत्तर देणारा नवा भारत दिसत आहे.’’



जवानांना पूर्ण पाठिंबा

जयशंकर यांना चीनबरोबरील सीमावादाबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, चीनने कराराचा भंग करत गेल्या तीन वर्षांत सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. त्यामुळे भारतानेही अतिउंचीवरील मोक्याच्या ठिकाणी आपले जवान तैनात केले आहेत.या जवानांना सरकारचे पूर्ण पाठबळ असून त्यांच्याकडे योग्य शस्त्रे, उपकरणे आणि आवश्‍यक पायाभूत सुविधा आहेत. पूर्वी चीन सीमेनजीक पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता मात्र भारत आपल्या हितांचे संरक्षण करण्यास सक्षम असून जगानेही ते मान्य केले आहे.भारत हा अधिक स्वावलंबी बनला आहे. कोणत्याही बाह्य दबावाचा आपल्या धोरणांवर परिणाम होत नाही. आम्ही कोणाबरोबर राजनैतिक संबंध ठेवावेत, कोणाबरोबर नाही, हे इतर कोणीही ठरवू शकत नाही. सध्याचा भारत हा आपल्या जनतेचे हिताचे संरक्षण करण्यास समर्थ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने