कर्नाटकच्या निवडणुकीला गुजराती तडका, अमूल-नंदिनीनंतर मिरची प्रकरण तापलं

कर्नाटक: कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याआधी राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय.अमूल दूध आणि नंदिनी दुधाचा  वाद चिघळला असतानाच आता नवा मुद्दा समोर आलाय. याचा राजकीय मंडळी निवडणुकीत लाभ घेण्याची शक्यता आहे.आशियातील सर्वात मोठ्या मिरची बाजारांपैकी एक असलेल्या ब्याडगीमध्ये आजकाल गुजराती मिरची  'पुष्पा'ची खूप चर्चा होत आहे. याला 'लाली' असंही म्हणतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काही महिन्यांत ब्याडगी मार्केटमध्ये  किमान 20,000 क्विंटल गुजरात मिरचीची विक्री झाली आहे. पुष्पा मिरच्या स्थानिक जातींपेक्षा लालसर दिसतात.



तथापि, ह्या मिरच्या फार काळ लालसरपणा टिकवून ठेवत नाहीत. राणीबेन्नू तालुक्यातील शेतकरी रमन्ना सुदांबी म्हणतात, 'मिरचीच्या डब्बी आणि कड्डी या जातींनी ब्याडगी मार्केटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. ब्याडगीच्या मिरच्या जगातील अनेक देशांमध्ये जातात. स्थानिक मिरचीची प्रतिष्ठा धोक्यात येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायला हवी. कर्नाटकात डब्बी आणि कड्डीचं उत्पादन घेतलं जातं.'

ब्याडगी संचालक एचवाय सतीश म्हणाले, 'या हंगामात गुजराती मिरचीचा पुरवठा सातत्यानं वाढत आहे. एपीएमसी कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर, खरेदीदार देशात कोठूनही शेतीमाल खरेदी करू शकतात. यासाठी बाजार समितीची परवानगी घेण्याची गरज नाही. अशा स्थितीत एपीएमसीला मर्यादा घालणं कठीण होणार आहे. डब्बी आणि कड्डी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यामुळं 'पुष्पा मिरची'ला ब्याडगी मिरचीच्या बाजारासाठी धोका म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही.' मात्र, कर्नाटकात सध्या निवडणुका असल्यामुळं हा राजकारणाचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने