रात्रंदिवस मेहनत करायला लागली तरी चालेल, पण शेट्टरांना..; येडियुरप्पांचं थेट चॅलेंज

कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर  यांना भाजपनं तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. मात्र, भाजप आणि शेट्टर यांच्यातील वाद अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये.

लिंगायत नेत्यांची घेतली भेट

एकीकडं भाजपनं माझा नव्हे तर कर्नाटकातील जनतेचा अपमान केल्याचा आरोप शेट्टर करत आहेत, तर दुसरीकडं माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी लिंगायत नेत्यांची भेट घेत शेट्टर यांना इशारा दिलाय. आम्ही दिवसरात्र काम करू, पण शेट्टर यांना विजयी होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.



'शेट्टरांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू देणार नाही'

बीएस येडियुरप्पा म्हणाले, 'हुबळीमध्ये लिंगायत नेत्यांसोबत अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक बडे लिंगायत नेते सहभागी झाले होते. मी त्यांना सांगितलं की, पक्ष मजबूत करायचा आहे. जगदीश शेट्टर यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी होऊ द्यायचं नाही. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायला हवी. आम्ही इथं मोठी रॅली आणि जाहीर सभा घेणार आहोत.'हुब्बळीत पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, 'आम्ही इथं कठोर मेहनत घेऊ आणि शेट्टर येथून जिंकणार नाहीत याची काळजी घेऊ. भाजपनं हुबळी-धारवाड सेंट्रलमधून पक्षाचे सरचिटणीस महेश टेंगिकाई यांना उमेदवारी दिली आहे. हा जगदीश शेट्टर यांचा बालेकिल्ला आहे.'

10 मे रोजी निवडणूक

कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने