मल्लिकार्जुन खर्गेंना शर्यतीत आणण्याची शिवकुमार यांची खेळी

बंगळूर : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यास मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव शर्यतीत आणण्याच्या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.मुख्यमंत्रीपदाचा वाद उभा करून खर्गे यांना पाठिंबा देण्याच्या शिवकुमार यांच्या हालचाली म्हणजे ‘तपासणी’ करण्याचा एक प्रयत्न म्हणून काहीजण पाहत आहेत. मुख्यमंत्री झाल्यास खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आपल्याला आवडेल, या शिवकुमार यांच्या विधानामुळे आणि खर्गे यांच्यावर यापूर्वीही अन्याय झाल्याचे सांगत पक्षांतर्गत आवाज उठत आहेत.



खर्गे आमचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपद मागितलेले नाही. काँग्रेस सत्तेत यावी, ही त्यांची एकमेव इच्छा आहे,’ असे शिवकुमार यांनी खर्गे यांचे नाव समोर आणण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.सोमवारी शृंगेरी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘पक्ष जे सांगेल, ते आपण पाळले पाहिजे. खर्गे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आहे. सिद्धरामय्या आणि इतरही पक्षांच्या नियमांचे पालन करतील. पक्ष महत्त्वाचा आहे.’’खर्गे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे का, यावर शिवकुमार म्हणाले की, मी पक्षाच्या निर्णयाचे पालन करीन. खर्गे माझ्यापेक्षा २० वर्षे ज्येष्ठ आहेत. त्यांच्या इच्छेसाठी मी नियमांशी कटिबद्ध आहे. आम्ही त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला पाहिजे.’’

हायकमांडच्या निर्णयाचे पालन : सिद्धरामय्या

सिद्धरामय्या यांनी रविवारी सांगितले की, प्रत्येकजण हायकमांडच्या निर्णयाचे पालन करेल. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९९ मध्ये एस. एम. कृष्णा, २००४ मध्ये एन. धरमसिंह आणि २०१३ मध्ये सिद्धरामय्या यांच्यामुळे खर्गे यांची तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली. खर्गे यांच्याकडे असलेली पदे आणि जबाबदाऱ्या पाहता त्यांच्या राज्याच्या राजकारणात परतण्याची शक्यता फारच मर्यादित आहे.तथापि, खर्गे यांच्याबाबत शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ‘दलित मुख्यमंत्री’ तसेच ‘मूळ आणि स्थलांतरीत’ या विषयावर वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी जी. परमेश्वर आणि के. एच. मुनियप्पा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही सहभाग आहे.

परमेश्वर यांनी अलीकडेच म्हटले होते की, पक्ष सत्तेवर आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या इच्छुकांपैकी आपणही एक आहोत. एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-धजद युती सरकारमध्ये परमेश्वर उपमुख्यमंत्री होते.ते सर्वाधिक काळ केपीसीसी प्रमुख (आठ वर्षे) होते. तर मुनियप्पा हे कोलारचे सात वेळा खासदार होते. तसेच २०१३-१८ दरम्यान सिद्धरामय्या यापूर्वीच एकदा मुख्यमंत्री पदावर होते. यावेळी काँग्रेसमध्ये मूळ काँग्रेसी व्यक्तीला मुख्यमंत्री बनवावे, अशी चर्चा आहे. सिद्धरामय्या यांनी २००६ मध्ये धजदमधून हकालपट्टी केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने